IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या सामन्याला खूप महत्वं दिलं जातं. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये उत्साह आणि रोमांच शिगेला पोहोचलेला असतो. त्यामुळं क्रिकेटप्रेमींमध्ये हा सामना सर्वाधिक लोकप्रिय आहे. या लोकप्रियतेमुळंचं दोन्ही देशांदरम्यान, कायम अत्यंत तणावाच्या वातावरणात सामना खेळला जातो. जेव्हा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात, त्यावेळी क्रिकेट सामन्याच्या व्यतिरिक्त दोन्ही संघातील खेळाडूतही बऱ्याच वेळा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. यातील काही असेही वाद आहेत, जे अजूनही कोणीच विसरू शकलेलं नाही. त्याबाबत जाणून घेऊय़ात...


जावेद मियाँदाद-किरण मोरे


1992 च्या विश्वचषक सामन्यात भारतानं पाकिस्तानला 217 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या दोन विकेट पडल्या होत्या. सचिन गोलंदाजी करत होता आणि जावेद मियांदाद फलंदाजी करत होता.  त्यावेळी किरण मोरे वारंवार अपील करत होते. ज्यामुळं याँदादने मोरे यांच्याबाबत पंचांकडं तक्रारही केली होती. मात्र, तरीही किरण मोरेचं अपील करणं सुरूच होतं. यावर मियांदाद इतका चिडला की त्यानं खेळपट्टीवर उड्या मारायला सुरुवात केली. ज्याचा व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल केला जातो. 


व्यंकटेश प्रसाद- आमिर सोहेल


व्यंकटेश प्रसाद आणि आमिर सोहेल यांच्यात 1996 च्या विश्वचषकात झालेला वाद आजही लोकांच्या लक्षात आहे. या सामन्यात भारतानं दिलेल्या 287 लक्ष्याचा पाठलाग करताना अमीर सोहेलनं चौकार मारून व्यंकटेश प्रसादला बोट दाखवलं. यानंतर पुढील चेंडूवर व्यंकटेश प्रसादनं अमीर सोहेलला बोल्ड केले. यानंतर व्यंकटेश प्रसादनं सोहेलला बोट दाखवत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.


गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी


2007 च्या कानपूर एकदिवसीय गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात झालेल्या भांडणाची घटना सर्वांना आठवत असेल. या घटनेत गंभीर आफ्रिदीच्या चेंडूवर धाव घेण्यासाठी धावला, तेव्हा आफ्रिदी धाव घेत असताना त्याच्यामध्ये आला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. 


हरभजन सिंह- शोएब अख्तर


भारताच फिरकीपटू हरभजन सिंह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यात 2010 मध्ये झालेल्या विश्वचषकात जबरदस्त वाद झाला होता. 47 व्या षटकात शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर हरभजन सिंहनं षटकार मारला. त्यानंतर अख्तरनं हरभजनला अनेक बाऊन्सर टाकले. ज्यामुळं दोघांत मैदानातच वाद सुरू झाला.


गौतम गंभीर-कामरान अकमल


गौतम गंभीर आणि कामरान अकमल यांच्यातील वाद क्रिकेटचा वाद अजूनही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. 2010 च्या आशिया कप सामन्यात सईद अजमलचा चेंडू गंभीरच्या बॅटमधून चुकला आणि कामरान अकमलच्या ग्लोव्हजमध्ये गेला. त्यावेळी अकमलनं चेंडू गंभीरच्या बॅटला लागल असून तो बाद असल्याची अपील केली. परंतु, पंचानी गंभीरला नाबाद घोषित केले. त्यानंतर ड्रिंक्स दरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या दोघांचा वाद मिटवण्यासाठी पंचांना मध्यस्ती करावी लागली.