ODI World Cup 2023 India vs Pakistan : विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धीमध्ये सामना होणार आहे. अहमदाबादच्या रणगणांत या दोन संघामध्ये काटें की टक्कर होईल. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी मैदानात छोटेखानी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे, कारण दोन्ही संघाने आतापर्यंत दोन दोन सामने जिंकले आहेत. पण शनिवारी होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा खिळल्या आहेत. शनिवारी कोणता संघ सलग तिसऱ्या विजयाची नोंद करतो, हेही पाहणं औत्सुक्याचे आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जातेय. या सामन्याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊयात... 


भारत-पाकिस्तान सामन्याची खेळपट्टी कशी आहे ?


अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर धावांचा पाऊस पडू शकतो. फलंदाजांची येथे चांदीच होणार आहे. फलंदाजीला पोषक असणाऱ्या या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार आहे. गोलंदाजांनाही येथे थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. सामना पुढे जसा जाईल तशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता जास्त आहे. मोठे मैदान असल्यामुळे गोलंदाज न घाबरता चेंडू टाकू शकतील. 


अहमदाबादच्या मैदानावर आतापर्यंत किती सामने ?


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आतापर्यंत 29 वनडे सामने झाले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 16 वेळा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 13 वेळा विजयी झाला आहे. नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी घेऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 237 इतकी आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 206 आहे. 


अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग 11 - 


सलामी फलंदाज शुभमन गिल याच्या कमबॅककडे सर्वांच्या नजरा असतील. सामन्याच्या पूर्वसंध्येला शुभमन गिल 99 टक्के खेळण्यास तयार असल्याचे रोहित शर्माने सांगितले होते. शुभमन गिल संघात परतल्यास ईशान किशन याला बेंचवर बसावे लागेल. डेंग्यूने बेजार झालेला शुभमन गिल पहिल्या दोन सामन्यांना मुकला आहे. पण आता पाकिस्तानविरोधात कमबॅक करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शार्दूल ठाकूर की अश्विनी की शामी हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. दुसरीकडे, पाकिस्तानच्या संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. श्रीलंकाविरोधात खेळलेले 11 शिलेदार भारताविरोधात मैदानात उतरतील, अशी शक्यता आहे. 


भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग 11 : 


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन/शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेईंग 11 : 


बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.