IND vs SL, 3rd ODI : तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाने आज इतिहास रचला. तब्बल 317 धावांच्या फरकाने सामना जिंकत भारताने एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने आधी फलंदाजी करत 390 धावा केल्या. ज्यानंतक 391 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाला अवघ्या 73 धावांवर सर्वबाद करत भारतानं 317 धावांनी सामना जिंकला. यावेळी भारताकडून फलंदाजीत विराटनं दीडशतक तर गिलनं शतक ठोकलं. ज्यानंतर गोलंदाजीत सिराजनं 4, शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. 






सामन्यात सर्वात आधी भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या करुन श्रीलंकेवर प्रेशर आणण्याचा भारताचा डाव होता. जो यशस्वीही ठरला. भारतानं तब्बल 390 धावांचा डोंगर उभारला. विराटनं नाबाद 166 तर शुभमन गिलनं 116 धावांची खेळी केली. सर्वात आधी कर्णधार रोहित आणि शुभमन यांनी आधी उत्तम सुरुवात करुन दिली. पण रोहित 46 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर कोहलीने गिलसोबत डाव सावरला. गिल 116 धावांवर गिल तंबूत परतला. त्याने 97 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकार ठोकत 116 धावा केल्या. त्यानंतर श्रेयसने कोहलीची साथ दिली. 38 धावा करुन अय्यरही बाद झाला. पण कोहली एका बाजूने तुफान फलंदाजी करतच होता. त्याने 110 चेंडूत 13 चौकार आणि 8 षटकार ठोकत नाबाद 166 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 50 षटकांत 390 धावा करत 391 धावांचे टार्गेट श्रीलंकेला दिले.


73 धावांत श्रीलंका सर्वबाद


391 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचे फलंदाज सुरुवातीपासूनच स्ट्रगल करताना दिसले. ज्यामुळे दुसऱ्या ओव्हरपासून त्यांचे गडी बाद होण्याचं सत्र सुरु झालं. ज्यानंतर 22 ओव्हरमध्ये 73 धावा करुन संपूर्ण संघ तंबूत परतला आणि भारतानं तब्बल 317 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. भारतासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी मोहम्मद सिराजनं केली. त्यानं 10 षटकांत 32 धावा देत 4 विकेट्स घेतले. त्याच्याशिवाय मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले. एक श्रीलंकेचा फलंदाज धावचित झाला.


हे देखील वाचा-