India vs Bangladesh 1st T20I : मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे 6 ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामन्यावर टांगती तलवार लटकली आहे. या सामन्याआधी अखिल भारतीय हिंदू महासभेने निषेध व्यक्त केला आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे या सामनावर निषेध करण्यात येत असल्याचे महासभेने म्हटले आहे. अशा स्थितीत सामना शांततेत पार पाडणे आणि त्याची सुरक्षा व्यवस्था करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.


ज्या बांगलादेशच्या भूमीवर हिंदूंवर अत्याचार झाले, त्या बांगलादेशच्या संघासोबत भारतीय भूमीवर क्रिकेटचे सामने खपवून घेणार नाहीत, असे अखिल भारत हिंदू महासभेने स्पष्टपणे सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी हिंदू महासभेने केली आहे. महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्ताने पंतप्रधानांना पत्र लिहून भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यांची मालिका रद्द करण्याची मागणी केली आहे.


14 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ग्वाल्हेर शहरात आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामना होत आहे. शहरातील शंकरपूर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर हा सामना 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र महान आर्यमन सिंधिया यांनी दिली आहे. ग्वाल्हेरच्या मातीत हा क्रिकेट सामना आयोजित करण्यासाठी ते बरेच दिवस प्रयत्न करत होते. मात्र आता हिंदू महासभा बांगलादेश संघाविरोधात मैदानात उतरली आहे.


पंतप्रधानांना रक्ताने लिहिलेले पत्र


हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ जयवीर भारद्वाज म्हणतात की, भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामन्याला विरोध केला जात आहे. कारण बांगलादेशमध्ये हिंदूंची कत्तल केली जात आहे. बांगलादेशात हिंदूंची घरे जाळली जात आहेत. अशा परिस्थितीत आपल्या देशाच्या क्रिकेट संघाचा सामना अशा भावना असलेल्या देशाच्या संघाशी होऊ नये.


त्यांनी सांगितले की, हिंदू महासभेने हा सामना रद्द करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. बांगलादेश संघाला देशाच्या भूमीवर खेळण्यापासून रोखले नाही तर ग्वाल्हेर येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्याला हिंदू महासभा तीव्र विरोध करेल, असा इशाराही हिंदू महासभेने दिला आहे.



संबंधित बातमी :


WI vs SA 2nd Test : आश्चर्यकारक! टेस्ट क्रिकेटमध्ये 11 फलंदाज झालं शून्यावर आऊट, तरीही मोडला नाही 'हा' विश्वविक्रम

Vinesh Phogat Video : विनेश फोगाटची प्रकृती खालावली अन् अचानक पडली बेशुद्ध...; कार्यक्रमादरम्यान मग काय घडलं?