IND vs PAK in Asia Cup 2022:  क्रिकेट चाहत्यांना लवकरच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. लवकरच दोन्ही संघामध्ये सामना होणार आहे. पुढील महिन्यात ऑगस्ट महिन्यात क्रिकेटचा महामुकबला होण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षीतील आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले असल्याची चर्चा  आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदाची आशिया कप स्पर्धा श्रीलंकेत पार पडणार आहे.


श्रीलंकेत आशिया कप स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयने हिरवा झेंडा दाखवला  आहे. ही स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 28 ऑगस्ट रोजी, रविवारी सामना होणार आहे. सामन्याच्या दिवशी रविवार असल्याने भारत-पाकिस्तानच्या सामन्यासाठी हा चांगला दिवस असल्याचे म्हटले जात आहे. बहुतांशी जणांना रविवारी सुट्टी असल्याने मैदानात मोठी गर्दी होईल. त्याशिवाय लाइव्ह सामना पाहणाऱ्यांचीही संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे टीआरपी आणि  महसूलात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. आशिया कप स्पर्धा टी-20 सामन्यांची असणार आहे. 


भारत आणि पाकिस्तानमधील शेवटचा सामना मागील वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी-20 विश्वचषक होणार आहे. त्यादृष्टीने आशिया कप स्पर्धा महत्त्वाची स्पर्धा आहे. 


आशिया कप स्पर्धेत यजमान श्रीलंका संघासह भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशने आपले स्थान पक्के केलं आहे. तर, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, ओमान, हाँगकाँग आणि इतर संघात पात्रता फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. या पात्रता फेरीतील विजेत्या संघाला आशिया कप स्पर्धेत संधी मिळणार आहे. 


मागील आशिया कप स्पर्धा 2018 मध्ये संयुक्त अरब अमिरातीत पार पडली होती. भारताने हा आशिया चषक जिंकला होता. टीम इंडियाने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: