(Source: Poll of Polls)
IND vs WI Live Score: सिराजने अर्धा संघ तंबूत पाठवला, कॅरेबिअन आर्मीची 255 पर्यंत मजल, भारताकडे 183 धावांची आघाडी
IND vs WI Live Score: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु आहे.
IND vs WI Live Score: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु आहे. दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय. मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा डाव 255 धावांवर संपुष्टात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 438 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजकडून कडवी टक्कर मिळाली, पण सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर विडिंजचा डाव 255 धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद सिराज याने वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत पाठवला. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने एकाकी झुंज दिली. ब्रेथवेट याने ७५ धावांची खेळी करत लढा दिला.
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर वेस्ट इंडिजचे फलंदाज फार काळ तग धरू शकले नाहीत. मुकेश कुमार याने आजच्या दिवसातील पहिली विकेट घेत वेस्ट इंडिजच्या डावाला सुरुंग लावला. त्यानंतर सिराजने उर्वरित सर्व खेळाडू तंबूत पाठले. क्रेग ब्रेथवेट याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. चंद्रपॉल याने ३३, मॅकेंझे ३२, ब्लॅकवूड २०, एलिक एनाथंझे ३७ यांचे प्रयत्न अपुरे पडले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा संयमी सामना केला, पण धावा जमवण्यात अपयश आले. वेस्ट इंडिजने ११६ षटकांचा सामना करत फक्त २५५ धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजचे फलंदाज खेळपट्टीवर तग धरुन राहिले पण त्यांना धावा जमवण्यात अपयश आले. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत धावसंख्येला आवर घातली.
Innings Break!
— BCCI (@BCCI) July 23, 2023
Superb show with the ball from #TeamIndia to bowl out West Indies for 255 👌 👌
5⃣ wickets for @mdsirajofficial
2⃣ wickets each for @imjadeja & Mukesh Kumar
1⃣ wicket for @ashwinravi99
Scorecard ▶️ https://t.co/d6oETzoH1Z#WIvIND pic.twitter.com/NCeJU3SK6p
मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजच्या तळाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडले. मोहम्मद सिराज याने वेस्ट इंडिजच्या अखेरच्या पाचही फलंदाजाला एकट्याने तंबूत पाठवले. विकेटकिपर फलंदाज जोशुआ डा सिल्वा, जेसन होल्डर, अल्झारी जोसे, केमर रोच आणि गॅरिबल यांना सिराजने बाद करत वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आणला. या एकाही फलंदाजाला २० धावसंख्याही पार करता आली नाही.
भारताकडून मोहम्मद सिराज याने भेदक मारा केला. सिराज याने ६० धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. तर पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमार याने दोन विकेट घेतल्या. अष्टपैलू रविंद्र जाडेजा याने दोन तर अश्विन याने एका फलंदाजांना बाद केले.