IND Vs WI, Match Highlights : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पाच विकेटने पराभव केला. बारबाडोसच्या मैदानावर वेस्ट इंडिजने दिलेल्या अवघ्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक उडाली होती. भारतीय संघाने 23 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 118 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून ईशान किशन याने  अर्धशतकी खेळी केली. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 च्या फरकाने विजय मिळवला. 


115 माफक आव्हानाचा पाठलाग करतानाही भारतीय संघाची दमछाक उडाली. 115 धावांसाठी भारतीय संघाला 23 षटके आणि पाच विकेट गमवाल्या लागल्या. 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज शुभमन गिल अवघ्या सात धावा काढून बाद झाला. सूर्यकुमार यादव यालाही मोठी खेळी करता आली नाही, सूर्यकुमार यादव 25 चेंडूत 19 धावा काढून बाद झाला. या खेळीत त्याने 3 चौकार आणि एक षटकार लगावला . हार्दिक पांड्या पाच धावांवर धावबाद झाला. शार्दूल ठाकूर याला फक्त एक धाव काढता आली. धावसंख्या कमी असल्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इतरांना फलंदाजीसाठी प्रमोट केले, पण या खेळाडूंना संधीचे सोनं करता आले नाही. रोहित शर्माने नाबाद 12 धावांची खेळी केली. तर रविंद्र जाडेजा 16 धावांवर नाबाद राहिला. ईशान किशन याने दमदार अर्धशतक झळकावले. ईशान किशन याने 46 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला.
वेस्ट इंडिजकडून मोटी याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.


भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान विडिंज संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडिज संघाला 50 षटकेही फलंदाजी करता आली नाही. विडिंजने 23 षटकात 114 धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजकडून शाय होप याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. त्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. वेस्ट इंडिजचे सात फलंदाज दुहेरी धावसंख्या पार करु शकले नाहीत. शाय होप 43, काइल मायर्स 2, ब्रँडन किंग 17, एलिक एथनाज 22, शिमरोन हेटमायर 11, रोवमन पॉवेल4, रोमारियो शेफर्ड 0, यानिक कारिया 3, डोमिनिक ड्रेक्स 3, जेडन सील्स 0 आणि गुडाकेश मोटी 0 धावा करु शकले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. शाय होप आणि हेटमायर यांनी संयमी सुरुवात करत विडिंजची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागिदारी केली.  ब्रँडन किंग आणि एलिक एथनाज  यांनी दुसऱ्या विकेटसाठी 38 धावा जोडल्या. या दोन भागिदारी वगळता विडिंजकडून एकही भागिदारी दुहेरी धावसंख्या पार करु शकली नाही. 



भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भेदक मारा केली. अनुभवी गोलंदाज नसतानाही भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. नवख्या भारतीय गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा संघ ढेपाळला. कुलदीप यादव याने सर्वाधिक विकेट घेतल्या. कुलदीप यादव याने 3 षटकात 4 विकेट घेतल्या.. यामध्ये दोन षटके निर्धाव फेकली. रविंद्र जाडेजा याने 6 षठकात 37 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय हार्दिक पांड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. उमरान मलिक याला विकेट घेण्यात अपयश आले.