India vs Sri Lanka, Asia Cup 2023: भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कप 2023 मध्ये खेळत आहे. टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद म्हणजे, दमदार फलंदाजी. भारतीय फलंदाज नेहमीच गोलंदाजांना धूळ चारताना दिसतात. विशेषत: फिरकीपटूंना. याच कारणामुळे भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या उपलब्ध आहेत. पण आशिया चषक 2023 मध्ये मंगळवारी (12 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चित्र काहीसं उलटं पाहायला मिळालं. भारतीय क्रिकेट संघाचा सुपर-4 फेरीतील हा दुसरा सामना होता. ज्यामध्ये टीम इंडिया 49.1 षटकांत केवळ 213 धावांवरच गारद झाली. मात्र, गोलंदाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघानं हा सामना 41 धावांनी जिंकून अंतिम फेरीत स्थान पटकावलं. 


टीम इंडियाचा लाजिरवाणा विक्रम 


एरव्ही प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर धुवांधार बरसणारे टीम इंडियाचे फलंदाज कालच्या सामन्यात मात्र ढेपाळल्याचं पाहायला मिळालं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, टीम इंडियाच्या सर्वच्या सर्व 10 विकेट्स श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी घेतल्यात. या सामन्यात श्रीलंका क्रिकेट संघाचा खरा हिरो होता, स्टार फिरकीपटू दुनिथ वेलालगे. या 20 वर्षीय मिस्ट्री स्पिनरनं एकट्यानं अर्ध्या भारतीय क्रिकेट संघाचा पराभव केला. या सामन्यात वेळलगेनं 10 ओव्हर्समध्ये 40 रन्स देत तब्बल 5 विकेट्स घेतले.


त्याच्यानंतर दुसरा स्टार गोलंदाज ऑफस्पिनर चारिथ असलंका होता, ज्यानं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ऑफस्पिनर महिष तीक्षणानं 1 विकेट घेतला. अशाप्रकारे, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघाविरुद्धच्या सर्व 10 विकेट फिरकीपटूंनी घेतल्या आहेत. टीम इंडियासाठीही हा एक लाजिरवाणा विक्रम आहे.


दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात हे दहाव्यांदा घडलं आहे, जेव्हा फिरकीपटूंनी एकदिवसीय डावांत सर्व 10 विकेट्स घेतल्या आहेत. पण टीम इंडियाविरुद्ध कोणत्याही संघानं अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच मैदानावर 1997 मध्ये टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध फिरकी गोलंदाजीक नऊ विकेट्स गमावल्या आहेत. 




वेललगेनं या सामन्यात रोहित, शुभमन, कोहली, ईशान आणि राहुलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. म्हणजे वेलालगेसमोर टॉप-5 फलंदाज कोसळले. तर असलंकानं ईशान किशन, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना आपलं बळी बनवलं. तीक्षनानं अक्षर पटेलला बाद केलं.


कोहली-गिल-पंड्या सर्वच फ्लॉप 


पाकिस्तानविरुद्ध सामनावीर ठरलेला विराट कोहलीनं श्रीलंकेविरुद्ध 12 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा करून झेलबाद झाला. सलामीवीर शुभमन गिलनं 19 धावा केल्या. तर पाचव्या क्रमांकावर आलेल्या केएल राहुलला केवळ 39 धावा करता आल्या. या सामन्यात ईशान किशनला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं, मात्र तोही 33 धावा करून माघारी परतला. स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पांड्यानं 31 धावा आणि जाडेजानं 40 धावा केल्या.


...अन् भारतानं सामना खिशात घातला 


कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून 213 धावा केल्या होत्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज होता, ज्यानं 48 चेंडूत 53 धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला अर्धशतकही करता आलं नाही. दुनिथ वेलालगे आणि चारिथ असलंका या दोन फिरकीपटूंसमोर जवळपास संपूर्ण टीम इंडियाच ढेपाळल्याचं पाहायला मिळालं.