IND vs SL Match Highlights: कुलदीप यादवच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. भाराताने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 172 धावांत संपुष्टात आला. या विजयासह टीम इंडियाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सुपर 4 फेरीत भारताने सलग दुसरा विजय नोंदवलाय. 


भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटागंण घातले. भारताने दिलेल्या 214 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अतिशय खराब झाली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करत लंकेच्या फलंदाजीला सूरंग लावला. 73 धावांत श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत परतला होता. श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती. 


निशांका 6, करुनारत्ने 2, कुशल मेंडिस 15 , समरमिक्रमा 17 आणि असलंका 22 धावा काढून तंबूत परतले. आघाडी फळी ढेपाळली होती. त्यामध्ये कर्णधार दासुन शनाका यालाही डाव सांभाळता आला नाही. शनाकाला जाडेजाने 9 धावांवर तंबूत पाठवले. 99 धावांत श्रीलंकेने 6 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर धनंजय डीसल्वा आणि वाल्लेलागा यांनी डाव सांभाळला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी करत विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण रविंद्र जाडेजाने ही जोडी फोडली. धनंजय 41 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादव याने तळाच्या फलंदाजांना जटपट गुंडाळले.  वाल्लेलागा 42 धावांवर नाबाद राहिला. कुलदीप यादव याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.




भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोची खेळपट्टी पाहून रोहित शर्माने टीम इंडियात अक्षर पटेल याला संधी दिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियासाठी सावध सुरुवात केली. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने वेल्लालागे याच्या हातात चेंडू दिला.. त्याने सामन्याचे चित्रच बदलले. वेल्लालागे याने भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिला. वेल्लालागे याने सर्वात आधी शुभमन गिल याला 19 धावांवर बाद  केले. त्यानंतर विराट कोहली याला तंबूत धाडले. कोहली फक्त तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा याला 53 धावांवर बाद केले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि केएल राहुल यांनी डाव सावरला. दोघांनी दमदार भागिदारी केली. पण वेल्लालागे याने राहुल याला बाद करत जोडी फोडली. 


चार दिवसांपासून कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर सामने होत आहेत. त्यातच पावसाचा व्यत्याय त्यामुळे खेळपट्टी गोलंदाजीला पोषक आहे. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक बाद केले. वेल्लालागे याच्यानंतर असलंका याने चार विकेट घेतल्या. असलंका याने रविंद्र जाडेजा, इशान किशन, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना तंबूत धाडले. रविंद्र जाडेजा याने मोहम्मद सिराजच्या साथीने टीम इंडियाची धावसंख्या वाढवली. शुभमन गिल 19, विराट कोहली 3, हार्दिक पांड्या 5 आणि रविंद्र जाडेजा 4 यांना मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस अक्षर पटेल याने मोहम्मद सिराज याला हाताशी धरत भारताची धावसंख्या 213 पर्यंत पोहचवली. सिराज आणि अक्षर पटेल यांनी 27 धावांची भागिदारी केली. सिराज पाच धावांवर नाबाद राहिला. अक्षर पटेल 26 धावांवर बाद झाला.