IND vs SL Women Asia Cup Final 2024: महिला आशिया चषक 2024 च्या (Women Asia Cup Final 2024) स्पर्धेत श्रीलंकेने बाजी मारली आहे. भारताविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने 8 विकेट्सने विजय मिळवला. या पराभवामुळे टीम इंडियाचं आशिया चषकावर आठव्यांदा नाव कोरण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. श्रीलंकेकडून कर्णधार चामरी अटापट्टूने 43 चेंडूत 61 धावा केल्या. तर हर्शिश्था समरविक्रमाने 51 चेंडूत 69 धावा केल्या. या खेळीत तिने 6 चौकार आणि 2 षटकार टोलावले. भारताने गोलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगली भागिदारी करत विजयाचा मार्ग सुकर केला.




भारताने श्रीलंकेला दिले होते 166 धावांचे लक्ष्य 


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 165 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने 47 चेंडूत सर्वाधिक 60 धावा केल्या. तिने या खेळीत 10 चौकार मारले. याशिवाय उमा छेत्री, हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. जेमिमाह रॉड्रिग्जनंतर रिचा घोषने अखेरच्या षटकांमध्ये शानदार खेळी केली. जेमिमाह रॉड्रिग्जने 16 चेंडूत 29 धावा केल्या. तर रिचा घोषने 14 चेंडूत 30 धावा केल्या. श्रीलंकेकडून कविशा दिलहरीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय उदेशिका प्रबोधनी, सचिन निशांक आणि चमारी अट्टापथू यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.






साखळी फेरीत टीम इंडियाची कामगिरी-


टीम इंडियाने साखळी फेरीत चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. टीम इंडियाने साखळी फेरीत तीन सामने खेळले आणि तिनही सामने जिंकले. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 7 विकेट्सने, यूएईचा 78 धावांनी तर तिसऱ्या सामन्यात नेपाळचा 82 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा 10 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये स्थान पक्के केले.


साखळी फेरीत श्रीलंकेची कामगिरी-


श्रीलंकेनेही साखळी टप्प्यातील तिनही सामने जिंकले. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 7 विकेट्सने, दुसऱ्या सामन्यात मलेशियाचा 144 धावांनी तर तिसऱ्या सामन्यात थायलंडचा 10 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर श्रीलंकेने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा 3 विकेट्स राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.


संबंधित बातमी:


Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरचा 'कांस्य'वेध; विजयानंतर म्हणाली, 'कृष्णाने अर्जुनाला केवळ...'