IND vs SL, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स पार पडलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 4 गडी राखून विजय मिळवण्यात यशस्वी झाला आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर 215 धावा करत 216 धावांचं माफक लक्ष्य भारताला दिलं. पण ते करतानाही भारताची वरची फळी स्वस्तात बाद झाल्याने सामना काहीसा रंगतदार झाला. अखेर राहुलच्या संयमी अर्धशतकाने सामना भारताने जिंकला. पांड्यानेही राहुलला चांगली साथ दिली. ज्यामुळे भारताने 6 गडी गमावत 43.2 षटकात निर्धारीत लक्ष्य पूर्ण केले. तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकलेल्या भारताने आजही विजय मिळवत मालिकाही 2-0 च्या विजयी आघाडीने नावे केली आहे.






सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. सामना होणाऱ्या ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने प्रथम फलंदाजी करत एक मोठं लक्ष्य भारतासमोर ठेवण्याचा श्रीलंका संघाचा डाव होता. पण भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा हा निर्णय चूकीचा ठरला. ज्यामुळे 39.4 षटकांत अवघ्या 215 धावांवर श्रीलंका संघ सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून पदार्पण करणाऱ्या एन. फर्नांडो याने अर्धशतक झळकावलं. याशिवाय कुसल मेंडीसनेही 34 धावा केल्या. भारताकडून सर्वच गोलंदाजांनी उत्तम ओव्हर्स टाकल्या. कुलदीप यादवने 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने अवघ्या 5.3 षटकांत 30 धावा देत 3 विकेट्स घेत सर्वोत्तम गोलंदाजी केली. याशिवाय उमरान मलिकेने 2 तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली. एक श्रीलंकेचा गडी धावचीतही झाला. 


केएल राहुलच्या अनुभवाचा संघाला फायदा


आजचा सामना भारताने जिंकला ज्यानंतर केएल राहुल फॅन्स नक्कीच कमालीचे आनंदी झाले. कारण मागील बराच काळ फॉर्ममध्ये नसलेल्या राहुलने मोक्याच्या क्षणी एक अप्रतिम नाबाद अर्धशतक झळकावत भारताला विजयापर्यंत नेलं. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुलने 103 चेंडूत 6 चौकार मारुन नाबाद 64 धावा केल्या. ज्यामुळे भारत सामना जिंकू शकला. सुरुवातीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर पांड्या आणि राहुलनेच अर्धशतकी भागिदारी केली. पांड्या 36 धावा करुन बाद झाल्यावर अक्षरने 21 तर कुलदीपने नाबाद 10 धावा करत भारताचा विजय पक्का केला.


हे देखील वाचा-