South Africa vs India 2nd T20I : ट्रिस्टन स्टब्सने शानदार खेळी करत दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात विजय मिळवून दिला. यासह दोन्ही संघांमधील चार सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत झाली आहे. आफ्रिकन संघाचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. फलंदाजी करताना टीम इंडियाचे स्टार खेळाडू दुसरा टी-20 सामन्यात सुपर फ्लॉप ठरले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 124 धावा केल्या. प्रत्युत्तरात स्टब्सने 41 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 47 धावांची नाबाद खेळी खेळली आणि संघाला तीन गडी राखून विजय मिळवून देण्यात यश मिळवले. भारताकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने चार षटकांत 17 धावा देत पाच बळी घेत संघाला विजयापर्यंत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण स्टब्सने त्याचे प्रयत्न उधळून लावला. 


लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात पण खराब झाली होती आणि 86 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. एकेकाळी वरुणच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या जोरावर भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते, पण शेवटी स्टब्सने आक्रमक खेळ करत संघाला विजयापर्यंत नेले. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या गोलंदाजांनी भारताला सुरुवातीपासूनच धक्के दिले आणि भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. 


नाव मोठे लक्षण खोटे! टीम इंडियाचे स्टार खेळाडू सुपर फ्लॉप


भारतीय डावाची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने 15 धावांवर आपले आघाडीचे 3 फलंदाज गमावले. यावेळी भारतीय संघ 100 चा टप्पा पार करेल असे वाटत नव्हते, पण हार्दिक पांड्याने भारतीय डावाची धुरा सांभाळत 45 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 39 धावा करत संघाची धावसंख्या 124 पर्यंत नेली. हार्दिक व्यतिरिक्त तिलक वर्माने 20 आणि अक्षर पटेलने 27 धावा केल्या.


सॅमसन, सूर्या, अभिषेक फ्लॉप


मागील 2 सामन्यात सलग शतके झळकावणारा संजू सॅमसन या सामन्यात फ्लॉप ठरला. सॅमसन पहिल्याच चेंडूपासून अटॅक मोडमध्ये दिसला आणि 3 चेंडूत खाते न उघडता बाद झाला. टी-20 मध्ये सलग दोन शतके झळकावल्यानंतर संजू सॅमसन तिसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव पण पुन्हा फेल ठरले. अभिषेक 5 चेंडूत 4 धावा तर 9 चेंडूत 4 धावा करून बाद झाला.


गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले


दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो योग्य ठरला. मार्को जॅनसेन आणि कोएत्झी या दोघांनी 4 षटकात 25-25 धावा देत 1-1 बळी घेतला. अँडिले, मार्कराम आणि पीटर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.