IND vs SA 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दिल्लीच्या (Delhi) अरूण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) तिसरा आणि अखेरचा सामना खेळला गेला. या निर्णायक सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 99 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर सलामीवीर शुभमन गिलनं संयमी 49 धावांची खेळी केली. भारतानं हा सामना 22.5 षटक शिल्लक ठेवून जिंकला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 नं जिंकलीय.


दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शिखर धवन (8 धावा) आणि ईशान किशननं (10 धावा) सुरुवातीला संयमी खेळी केली. परंतु, भारताच्या डावातील सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार शिखर धवन रनआऊट झाला. त्यानंतर अकराव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ईशान किशनच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. दरम्यान, युवा फलंदाज शुभमन गिल (49 धावा) आणि श्रेयस अय्यरनं (नाबाद 28 धावा) संघाचा डाव सावरला. संघाला अवघ्या तीन धावांची गरज असतान शुभमन गिल आऊट झाला. अवघ्या एका धावानं त्याचं अर्धशतक हुकलं. भारतानं हा सामना सात विकेट्स राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी ,बी. फॉर्च्युन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


ट्वीट-



भारताची भेदक गोलंदाजी
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळला गेलेल्या या सामन्यात भारताचा कर्धणार शिखर धवननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अक्षरशः गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.1 षटकांत अवघ्या 99 धावांवर ढेपाळला. भारताकडून चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि शाहबाज अहमद यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. 


तीन सामन्यात तीन नवे कर्णधार
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघ तीन वेगवेगळ्या कर्णधाराच्या नेतृत्वात मैदानात उतरला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात नियमित कर्णधार टेम्बा बावुमानं दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व केलं होतं, जो सामना भारतानं गमावला होता. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केशव महाराजच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. तर, एकदिवसीय सामन्यात डेव्हिड मिलरच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 99 धावांवर ऑलआऊट झाला आणि सात विकेट्सनं हा सामना गमावला.


हे देखील वाचा-