IND vs PAK Asia Cup 2023 LIVE: कोलंबोमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना उशीराने सुरु होणार आहे. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडिअमची खेळपट्टी आणि मैदान कव्हर्सने झाकण्यात आलेय. मैदानातील कर्मचारी दोन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी मेहनत करत आहे. पण वरुणराजा धो धो कोसळत आहे. रविवारीही मुसळधार पाऊस आल्यामुळे सामना अर्ध्यावरच थांबवावा लागला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना वादळी सुरुवात केली. पण पावसाने खोळंबा घातल्यामुळे चाहत्यांच्या रंगाचा बेरंग झाला आहे. राखीव दिवशी, म्हणजेच आजतरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार का? या चर्चेला उधाण आलेय. 


आजही मुसळधार पावसाचा अंदाज - 


कोलंबोमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिवसभरात 70 टक्केंपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोलंबोत सोमवारची सुरुवातच मुसळधार पावसाने झाली. त्यानंतर सकाळी पावसाने विश्रांती घेतली होती. सामना होईल, अशी आशा असतानाच पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. कोलंबोमध्ये मागील तासभरापासून पावसाचा लपंडाव सुरु आहे. सतत पाऊस कोसळत असल्यामुळे खेळपट्टी आणि मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले आहे. कोलंबोत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता 95 टक्के आहे. वाऱ्याचा वेग 41 किमी/तास असेल. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.


भारत - पाकिस्तान सामना रद्द झाला तर...


सुपर 4 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. पाकिस्तान संघाने सुपर 4 मधील पहिला सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाकडे तीन गुण होतील. तर भारताचा हा पहिलाच सामना असल्यामुळे फक्त एक गुण असेल.



रविवारी काय झाले होतं ?
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी बाबरचा निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 100 चेंडूत 121 धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने 49 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर गिल याने 52 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने 10 चौकार लगावले. आजच्या दिवशाचा सामना थांबला तेव्हा विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर फलंदाजी करत होते. भारतीय संघाने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या आहेत. उद्या, सोमवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उर्वरित सामना होणार आहे. रविवारी खेळ जिथे संपला तेथूनच आज सामन्याला सुरुवात होणार आहे.