India Cricket Team Reserve Day : आशिया चषकातील सुपर 4 च्या सामन्याला सुरुवात झाली आहे.  भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामन्याला सुरुवात झाली पण पावसामुळे सामना थांबवावा लागला. आता राखीव दिवशी म्हणजे, आज उर्वरित सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात करुन दिली. पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि केएल राहुल मैदानावर आहेत. आज राखीव दिवशी सामन्याला सुरुवात होणार आहे. दुपारी तीन वाजता सामना सुरु होईल. पण राखीव दिवस भारतासाठी आतापर्यंत फलदायी ठरलेला नाही. 


आशियन क्रिकेट परिषदने याआधीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा केली होती. कोलंबोमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. रविवारी जिथे सामना थांबला तेथूनच पुढे सुरुवात होणार आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर आज दुपारी तीन वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावल्यास दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. भारतीय संघासाठी राखीव दिवस फलदायी ठरलेला नाही. हे आकडेवारीवरुन समजतेय. 


भारतासाठी राखीव दिवस का धोकादायक? पाहा काय सांगतोय इतिहास  
2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती. या महामुकाबल्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. राखीव दिवशी भारताला आठ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला होता. त्यानंतर आयसीसीने सामना राखीव दिवशी घेण्याचा निर्णय घेतला होता. पण राखीव दिवस भारतासाठी धोकादायक ठरला. भारताला आठ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता. 


 आशिया चषकात पावसाचाच खेळ, सामन्यात वारंवार व्यत्यय - 


आशिया चषक हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या चारही सामन्यात पावसाने हजेरी लावली नव्हती. पण श्रीलंकेत होत असलेले सामने पावसामुळे प्रभावित झाले आहेत. साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमांनुसार लागला होता. आता सुपर 4 सामन्यातही पावसाने हजेरी लावली आहे. कोलंबोमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे सामने प्रभावित होत असल्यामुळे आशिया चषकाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.