IND vs NZ: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) ऐकमेकांशी भिडणार आहेत. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. यामुळे दोन्ही संघ आपल्या सक्षम खेळाडूंना मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहेत. यातच पाकिस्तान विरुद्ध सामन्यात दुखापतग्रस्त झालेला न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) याच्या फिटनेसबाबत महत्वाची माहिती समोर आली. भारतीय संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात मार्टिन गप्टिल संघाचा भाग असेल, अशी माहिती न्यूझीलंडच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी दिली. मार्टिन गप्टिल आक्रमक फलंदाज असून आजच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.


न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हा आधीच स्नायूंच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याला खेळता आले नाही. यातच न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी मार्टिन गप्टिलच्या फिटनेसबाबत महत्वाची अपडेट्स दिली. गॅरी स्टेड म्हणाले की, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात गप्टिलला दुखापत झाली. परंतु, शुक्रवारी त्याने नेटमध्ये सराव केला. गप्टिल आता तंदुरूस्त असून भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली.


पाकिस्तानविरुद्ध सामन्यात न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. न्यूझीलंडने 20 षटकांत 8 विकेट्स गमावून केवळ 134 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा गाठता आला नाही. या सामन्यात फिरकीपटू ईश सोधीने दोन, तर टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. 


विश्वचषकातील 28 व्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमने-सामने येणार आहेत. भारत आणि न्यूझीलंडने सुपर-12 मध्ये प्रत्येकी एक सामना खेळला आहे, ज्यात दोन्ही संघाला पराभव पत्कारावा लागला. महत्वाचे म्हणजे,  शारजाह किंवा दुबईतील प्रत्येक धावपट्टी आतापर्यंत प्रथम गोलंदाजी करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरली. आतापर्यंत झालेल्या 14 पैकी 12 सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ विजयी ठरला आहे. 


संबंधित बातम्या-