(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ Semi-Final: सेमीफायनलचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास, काय होणार? फायनलचं तिकीट कोण गाठणार?
ICC World Cup 202 Semifinal: विश्वचषक 2023 मधील भारतीय क्रिकेट संघाचा सेमीफायनचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया न्यूझीलंडसोबत भिडणार आहे.
India vs New Zealand: विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) मध्ये लीग स्टेजमधील सर्व 45 सामने खेळले गेले आहेत. लीग स्टेजनंतर विश्वचषकातील सेमीफायनलचे चार संघ ठरले आहेत. तर, सहा संघ आपापल्या बॅगा भरुन मायदेशी परतले आहेत. सेमीफायनलमध्ये पोहोचलेले चार संघ मुंबई (Mumbai) आणि कोलकात्यात (Kolkata) तळ ठोकून आहेत. टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सेमीफायनलचा (ICC World Cup 2023 Semifinal) सामना खेळवण्यात येणार असून 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. लीग स्टेजमधील सर्वच्या सर्व सामने टीम इंडियानं जिकले आहेत. लीग स्टेजमध्ये एकदा टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडवर मात करत विजय मिळवला होता. आता सेमीफायनल्समध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे सेमीफायनल्सचं आव्हान पार करुन कोणता संघ फायनल्सचं तिकीट कन्फर्म करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
The last four teams 🙌
— ICC (@ICC) November 12, 2023
Who's your pick to lift the #CWC23 trophy? 🏆 pic.twitter.com/VNe14gb64o
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात पावसाचा धोका नसला तरी सध्या भारताच्या काही भागांत ढगाळ वातावरण असून सर्वत्र पाऊस पडत आहे. म्हणजेच, सेमीफायनलच्या या सामन्यात पावसाची काहीशी शक्यता कायम आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही पाऊस अडथळा ठरला तर काय होईल? किंवा हा संपूर्ण सामना पावसामुळेच खेळलाच गेला नाहीतर काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेऊयात...
रिझर्व्ह डे की डकवर्थ-लुईस रूल
ICC नं विश्वचषक 2023 च्या सेमीफायनल्सच्या सामन्यांसाठी राखीव दिवसाची व्यवस्था केली आहे. म्हणजेच, या सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास दुसऱ्या दिवशीचा खेळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, ओव्हर्स कमी केल्या जाणार नाहीत. राखीव दिवशीही पाऊस पडला आणि डकवर्थ-लुईस पद्धतीनं दुसऱ्या डावात आवश्यक तेवढी षटकं खेळली गेली, तर विजयी किंवा पराभवाचा निर्णय होईल. पण दुसऱ्या डावात आवश्यक षटकं टाकता आली नाहीत, तर मात्र, पॉईंट टेबलमधील स्थानाच्या आधारे विजेता घोषित केला जाईल.
सामन्यादरम्यान पावसानं धुमशान घातलं तर याचा फायदा कोणाला?
टीम इंडिया आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन्ही दिवशी पाऊस पडला आणि डकवर्थ लुईस रूलचा अवलंब करून षटकं टाकता आली नाहीत, तर टीम इंडियाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल, असा निष्कर्ष निघतो. कारण पॉईंट टेबलमध्ये भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे. तो पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यातही निकाल असाच लागेल. म्हणजेच, दुसरा सेमीफायनल्सचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचेल.