Ind vs NZ, 2nd Test Match Highlights : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. दिवसाची सुरुवात भारतीय संघाने चांगली केली. सलामीवीरांनी तब्बल 80 धावांची भागिदारी केली. पण सलामीवीर शुभमन गिल 44 धावा करुन बाद होताच एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतू लागले. केवळ मयांकने (Mayank Agarwal) टिकून राहत शतक झळकावल्यामुळे भारताने किमान 200 धावांचा आकडा पार केला आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) चमकदार कामगिरी करत 4 विकेट खिशात घातल्या आहेत.
सामन्याची सुरुवात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडत केली. ज्यानंतर सलामीवीर मयांक अगरवाल आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण संघ 80 धावांवर पोहोचताच शुभमन 44 धावा करुन बाद झाला. अजाज पटेलच्या चेंडूवर रॉस टेलरने त्याची झेल घेतली. त्यानंतर काही चेंडूनंतरच पुजारालाही एजाजने त्रिफळाचीत केलं. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराटलाही अजाजने पायचीत करत 80 धावांवरच भारताचे तीन महत्त्वाचे गडी तंबूत धाडले. त्यानंतर काही काळ श्रेयस अय्यर आणि मयांकने संघाचा डाव सांभाळला. पण 18 धावा करुन श्रेयस अजाजच्या चेंडूवर टॉम ब्लंडलच्या हाती झेलबाद झाला. ज्यामुळे भारताचे महत्त्वाते 4 ही फलंदाज तंबूत परतले. पण मयांकने मात्र टिकून राहत फलंदाजी केली. रिद्धिमान साहाने त्याला साथ देत दिवस संपेपर्यंत खिंड लढवली. ज्यामुळे दिवस अखेर भारताने 4 विकेट्सच्या बदल्यात 221 धावा केल्या आहेत. मयांक 120 आणि साहा 25 धावांवर खेळत आहे.
'मुंबईकर' एजाज मुंबईत चमकला
न्यूझीलंडच्या कसोटी संघातील फिरकीपटू एजाज पटेलने आज सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. विशेष म्हणजे अजाज हा मूळचा भारतीयचं आहे. त्याचा जन्म 1988 साली मुंबईत झाला होता. ज्यानंतर 1996 मध्ये अजाजचं संपूर्ण कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झालं. दरम्यान 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या एजाजने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट कामगिरी आज मुंबईच्या मैदानावर भारताविरुद्ध केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Mumbai Women Cricket Scorer : मुंबई कसोटीत स्कोरिंगची सूत्रं 'ती'च्या हाती
- IND vs NZ Live Updates : टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय
- Year Ender 2021 : यंदाच्या वर्षभरात 'या' 5 खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावा, यादीत एकही भारतीय नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha