IND vs ENG Semi Final 2024 T20 World Cup : टी20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत माज उतरवला. 2023 वनडे वर्ल्डकप फायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या पराभवाचा वचपा काढला. भारताकडून पराभूत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचं टी20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर काढल्यानंतर आता इंग्लंडचा क्रमांक आहे. भारतीय संघ इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यासाठी सज्ज झालाय. 2022 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला होता. एडिलेडमध्ये इंग्लंडने भारताचा दहा विकेटने दारुण पराभव केला होता, याचाच बदला घेण्याची संधी टीम इंडियाकडे चालून आली आहे. हे दोन्ही संघ पुन्हा एकदा उपांत्य सामन्यात भिडणार आहेत. गुरुवारी भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. 


टी20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडिया सध्या अजेय आहे. साखळी फेरीत आणि सुपर 8 मध्ये भारताने शानदार कामगिरी केली आहे.  कागदावर रोहित शर्माचा संघ अतिशय तुल्यबळ आणि मजबूत दिसत आहे. वेस्ट इंडिजमधील मैदानावर फिरकी गोलंदाजांचा दबदबा आहेच. भारताचा कुलदीप यादव आणि इंग्लंडचा आदिल रशिद यांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. नॉकआऊट सामन्यात दोन्ही गोलंदाजांकडे क्रीडा विश्वाच्या नजरा असतीलच. पण या मैदानावर फिरकी गोलंदाजासह वेगवान गोलंदाजांनाही चांगली मदत मिळत आहे. गयानाच्या मैदानावर अफगाणिस्तानचा वेगवान गोलदाज फजहलक फारुकी यानं न्यूझीलंडविरोधात भेदक मारा करत विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. आता त्याच मैदानावर भारत आणि इंग्लंड यांचा सामना होणार आहे. 8 जूनपासून गयानाच्या मैदानावर विश्वचषकाचा एकही सामना झाला नाही. त्यामुळे नॉकआऊट सामन्यासाठी खेळपट्टी तयार करण्यासाठी मैदानाच्या कर्णचारऱ्यांना खूप वेळ मिळलाय. 


विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा


साखळी फेरीत आणि सुपर 8 मध्ये भारताने शानदार प्रदर्शन केलेय. पण उपांत्य फेरीत दबावात चुका होण्याची शक्यता आहे. भारताला विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. विराट कोहलीला अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मोक्याच्या सामन्यात विराटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होतेय. दुसरीकडे रोहित शर्मा शानदार फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात रोहित शर्माने 92 धावांची वादळी खेळी करत इंग्लंडला सावध राहण्याचा इशाराच दिलाय. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी फलंदाजांकडे टी20 विश्वचषक जिंकण्याची अखेरची संधी असेल. त्यामुळे नॉकआऊट सामन्यात दोघांकडून शानदार कामगिरीची अपेक्षा असेल. 


 मध्यक्रममध्ये ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांनी आतापर्यंत आपली कामगिरी चोख बजावली आहे. पण शिवम दुबे याला अद्याप हवा तसा सूर गवसला नाही. लेग स्पिनर रशिदचा तो कसा सामना करतोय, याकडे नजरा लागल्यात.  हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजा यांनी आतापर्यंत आपली कामगिरी चोख बजावली आहे. रवींद्र जाडेजाला अद्याप सूर गवसला नाही, पण सरासरी कामगिरी झाली आहे. 


युजवेंद्र चहलला संधी मिळणार का ?


गोलंदाजीत रोहित शर्मा लेग स्पिनर युजवेंद्र चहल याला संधी देणार का? याची जोरदार चर्चा सुरु आहे. फिलिप सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक आणि जॉनी बेयरस्टो यासारख्या आक्रमक फलंदाजांविरोधात युजवेंद्र चहल प्रभावी ठरू शकतो, त्यामुळे रोहित शर्मा नॉकआऊट सामन्यात चहलला संधी देणार का? याकडे नजरा लागल्या आहेत. टी20 विश्वचषकात युजवेंद्र चहल याला आतापर्यंत एकही सामन्यात संधी मिळालेली नाही. यापुढे संधी मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे त्रिकूट लयीत आहेत. कुलदीप यादवने मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या आहेत. तर जाडेजा आणि अक्षर पटेल गोलंदाजीसोबत फलंदाजीत योगदान देत आहेत. पण गयानाच्या खेळपट्टीवर रोहित शर्मा युजवेंद्र चहल याला संधी देऊन मास्टरस्ट्रोक खेळणार का? हे गुरुवारीच समजेल. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप यांनी भेदक मारा केलाय. 


दुसरीकडे  विश्वचषकात इंग्लंडची कामगिरी सरासरी राहिली आहे. त्यांना सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पण अखेरच्या दोन सामन्यात त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला, त्यामुळे उपांत्य फेरीचं तिकिट मिळाले. जोस बटलर याच्यावर इंग्लंडच्या फलंदाजीची भिस्त आहे. त्याला भारतीय आक्रमणासमोर खेळण्याचा तगडा अनुभव आहे. सॉल्ट, जॉनी बेयरस्टो, मोईन अली यांची कामगिरीही सरासरी राहिली आहे. हॅरी ब्रूक लयीत आहे, पण त्याच्यामध्ये सातत्य दिसत नाही.  लियाम लिविंगस्टोन आणि मोईन अली यांच्यासोबत अदिल रशिद गोलंदाजीत प्रभावी मारा करु शकतात. रशिदची चार षटकं निर्णायक ठरणार आहेत, यामध्ये टीम इंडियाने वर्चस्व राखल्यास विजय निश्चित असेल.  


परस्परविरोधी दोन्ही संघ - 


भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज  


इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जोर्डन, लियाम लिविंगस्टोन, आदिल राशिद, फिल सॉल्ट, रीस टॉपले आणि  मार्क वूड