IND Vs ENG : इंग्लंड विरोधातील कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील एक खेळाडू म्हणजे, ऋषभ पंत. पण अद्याप दुसऱ्या खेळाडूचं नाव समजलेलं नाही.
एएनआय वृत्तसंस्थेनं टीम इंडियातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त दिलं आहे. इंग्लंडच्या प्रोटोकॉलनुसार, कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या खेळाडूचं नाव जाहीर केलं जात नाही. त्यामुळे अद्याप इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयकडून अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. अशातच टीम इंडियातील ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
ऋषभ पंत काही दिवसांपूर्वी युरो कपचा सामना पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर ऋषभ पंतला घशात वेदना होत होता. याव्यतिरिक्त थंडी वाजणं आणि खोकला होणं यांसारखी काही लक्षणंही ऋषभमध्ये दिसून आली होती. ऋषभ पंतला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. अशातच टीमसोबत पुन्हा सराव सुरु करण्यापूर्वी ऋषभला पुन्हा एकदा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ऋषभ पंतला संघात पुनरागमन करता येणार आहे.
दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना तीन दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे खेळाडू संघातील इतर खेळाडूंसोबत जोडले जाणार आहेत. या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयचं लक्ष असून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव
इंग्लंडमध्ये कोणत्याही क्रिकेटरला कोरोनाची लागण होण्याची ही पहिली वेळ नाही. दोन दिवसांपूर्वी संपलेल्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानच्या सीरिजमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी इंग्लंडच्या चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.
खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं इंग्लंड क्रिकेट बोर्डनं पाकिस्तानसोबतची सीरिज खेळण्यासाठी आपला संपूर्ण संघच बदलला होता. इंग्लंडच्या खेळाडूंचा आयसोलेशनचा काळ संपला आहे. तसेच पाकिस्तान विरुद्धच्या टी20 सीरिजसाठी त्यांची संघात वापसी झाली आहे.
दरम्यान, टीम इंडियामधील खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यासंदर्भात ईसीबी किंवा बीसीसीआयकडून आतापर्यंत कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही. दोन्ही देशांमध्ये पहिला कसोटी सामना चार ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IND Vs ENG : इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण, नाव गुलदस्त्यात