IND Vs ENG 4th Test 1st Day Highlights | अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. त्यानंतर पहिला डाव खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात मात्र फारशी चांगली झाली नाही. टीम इंडियाने पहिला दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात एक विकेट गमावत 24 धावा केल्या. यापूर्वी अक्षर पटेलनं उत्तम खेळी करत केवळ 68 धावा देत चार विकेट्स घेतले.


पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजाराने 36 चेंडूंवर एक चौकार लगावत 15 धावा आणि रोहित शर्माने 34 चेंडूंवर एक चौकार लगावत आठ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या वतीने जेम्स एंडरसनने एक विकेट घेत शुभमन गिलला खातं न खोलताच माघारी धाडलं. दरम्यान, इंग्लंडचा स्टार स्पिनर जॅक लीच पहिल्या दिवशी फारशी चांगली खेळी करु शकला नाही. त्याने चार ओव्हर्समध्ये 16 धावा केल्या.


इंग्लंडने जिंकाला होता टॉस


यापूर्वी इंग्लंडने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, इंग्लंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. इंग्लंडच्या संघाच्या खराब सुरुवातीनंतर संघ पहिल्याच दिवशी ऑलआउट झाला. इंग्लंडच्या वतीने बेन स्टोक्सने 121 चेंडूंवर सहा चौकार आणि दोन षटकार लगावत सर्वाधिक 55 धावा केल्या. याव्यतिरिक्त डेनियल लॉरेंसने 46, ओली पोपने 29 आणि जॉनी बेयरस्टोने 28 धावा केल्या. तर जेम्स एंडरसन 10 धावा करुन नाबाद राहिला.


टीम इंडियाकडून अक्षर व्यतिरिक्त रविचंद्रन अश्विनने 47 धावा देत तीन विकेट्स, मोहम्मद सिराजने 45 धावा देत दोन विकेट्स आणि वॉशिंग्टन सुंदरने 14 धावा देत एक विकेट घेतला. ईशांत शर्मा 23 धावा देत एकही विकेट घेऊ शकला नाही.


दरम्यान, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने आधीच 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे. टीम इंडियाला आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी इंग्लंडसोबतचा अंतिम कसोटी सामना ड्रॉ करणं गरजेचं आहे. पण जर इंग्लंडनं हा सामना जिंकला आणि 2-2 अशी बरोबरी केली, तर मात्र जूनमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :