England vs India Rescheduled match Result: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं भारताचा सात विकेट्सनं पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताविरुद्ध अखेरचा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनं (Ben Stokes) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 


बेन स्टोक्स काय म्हणाला?
बर्मिंगहॅम कसोटी सामना संपल्यानंतर बेन स्टोक्स म्हणाला की, "आम्ही पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, विशेषत: इंग्लंडमध्ये!  आम्हाला कसोटी क्रिकेटला नवीन जीवन द्यायचंय आणि पाठिंबा देखील अविश्वसनीय आहे. कसोटी क्रिकेटसाठी चाहत्यांसाठी आम्ही संपूर्ण नवीन संच आणत आहोत. आम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये छाप सोडायची आहे."


डब्लूटीसीमधील भारताचे 2 गुण कापले
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात स्लो ओव्हर रेट ठेवल्यामुळं आयसीसीनं भारताविरुद्ध कारवाई केलीय. भारतीय संघ अपेक्षित षटकांपेक्षा 2 षटके मागं खेळत होता. भारताचे दंडाच्या स्वरूपात आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील 2 गुण कापण्यात आले. तसेच खेळाडूंच्या मॅच फीसच्या 40 टक्के रक्कम कापण्यात आली.


बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात भारताचा सात विकेट्सनं पराभव
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतानं भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात 284 धावांवर रोखत 134 आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 245 धावांपर्यंत मजल मारता आली. अखेरच्या डावात इंग्लंडला 378 धावांची गरज असताना जो रूट (142 धावा) आणि जॉनी बेअरस्टोनं (114 धावा) दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.


हे देखील वाचा-