Shubman Gill IND vs ENG: युवा फलंदाज शुभमन गिल राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात शतकापासून चुकला आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या शुभमन गिल दुसऱ्या डावात लयीत फलंदाजी करत होता. तो शतकाच्या जवळही पोहचला होता. पण कुलदीप यादवच्या चुकीमुळे शुभमन गिल धावबाद झाला. त्यामुळे त्याचं शतक हुकलं. धावबाद झाल्यानंतर शुभमन गिल याला राग अनावर आला. त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात शुभमन गिल 91 धावांवर धावबाद झाला. दुसऱ्यांदा शुभमन गिल नर्वस 90 चा शिकार झालाय.
कुलदीपची चूक, फटका शुभमन गिलला -
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यास काही षटकं शिल्लक होती, त्यावेळी रजत पाटीदार बाद झाला. त्यामुळे कुलदीप यादव याला नाईट वॉचमन म्हणून बढती देण्यात आली. तिसऱ्या दिवशी कुलदीप यादवनं आपलं काम चोख बजावलं. त्यांनंतर चौथ्या दिवशीही त्यानं लयीत फलंदाजी केली. शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांच्यामध्ये अर्धशथकी भागिदारीही झाली. पण मोठा फटका मारल्यानंतर कुलदीप यादव चेंडूकडेच पाहत राहिला, तोपर्यंत शुभमन गिल याने क्रीझ सोडलं होतं. इंग्लंडच्या फिल्डरने कोणतीही चूक केली नाही, चेंडू गोलंदाजाकडे टाकला. त्यामुळे शुभमन गिल धावबाद झाला. कुलदीप यादव याच्या चुकीमुळे शुभमन गिल याचं अर्धशतकं हुकलं. गिल कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच रन आऊट झाला आहे. तसेच 2021 नंतर तो आता पुन्हा 91 धावांवर बाद झाला. शुभमन याआधी बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावातही 91 धावांवर बाद झाला होता.
शुभमन गिलचं शतक 9 धावांनी हुकलं -
विशाखापट्टनम कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार शतक करत शुभमन गिल लयीत परतला होता. पण राजकोट कसोटीमध्ये तो शतकाजवळ पोहचला होता, पण त्याचं शतक 9 धावांनी हुकलं. शुभमन गिल यानं 98 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं अर्धशतक ठोकलं. त्यानं हळूहळू शतकाकडे वाटचाल केली होती. पण 64 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर धावबाद झाला. कुलदीप यादव याने जोरदार फटका मारला, तो चेंडू बेन स्टोक्स यानं चपळाईनं अडवला. तोपर्यंत शुभमन गिलनं क्रिझ सोडलं होतं. बेन स्टोक्स यानं चपळाईनं चेंडू गोलंदाज हार्टलीकडे टाकला, अन् गिल धावबाद झाला. त्यावेळी शुभमन गिल 91 धावांवर खेळत होता. तो शतक करणार असेच सर्वांना वाटत होतं. पण त्याचं शतक हुकलं. शतक हुकल्यानंतर शुभमन गिल निराश दिला. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.