IND vs ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवलाय. भारताने इंग्लंडचा तब्बल 434 धावांनी धुव्वा उडवला. यशस्वी जैस्वालची द्विशतकी खेळी आणि रवींद्र जडेजाने पटकावलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला. यशस्वी जैस्वालच्या द्वशतकी खेळीने भारताने भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर रवींद्र जाडेजाच्या फिरकीपुढे इंग्रजांनी अक्षरश: नांगी टाकली आहे. टीम इंडियाचा कसोटी इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. हा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. या विजयाने टीम इंडियाने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. 


यशस्वीच्या तडाख्याने इंग्लंडचा धुरळा 


भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 236 चेंडूत 12 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 214 धावा काढल्या. यशस्वीच्या खेळीमुळे भारताकडे 556 धावांची आघाडी घेतली. जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानल्या जाणाऱ्या जेम्स अँडरसनची त्याने सलग तीन षटकार लगावत धुलाई केली. त्यामुळे इंग्लंडला 557 धावांच्या विशाला लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. टीम इंडियाच्या 557 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 122 धावांवर ढेपाळला. भारताकडून रवींद्र जाडेजाने 5 विकेट्स पटकावल्या. तर कुलदीप यादवने दोन विकेट्स पटकावत त्याला साथ दिली.  










जाडेजा आणि सिराजची आक्रमक गोलंदाजी 


चौथ्या दिवशी जाडेजाने 5 विकेट्स पटकावत टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा उचलला. जाडेजाच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या मध्यक्रमाने अक्षरश: नांगी टाकली. त्याने जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स आणि जो रूट तिघांना बाद करत टीम इंडियाची स्थिती भक्कम केली.  तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव सुरु झाला तेव्हा बेन डकेटने जोरदार फटकेबाजी केली होती. त्याने 151 चेंडूमध्ये 153 धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीनंतर इंग्लंडने सामन्यात टीम इंडियाला मागे टाकले होते. मात्र, आज मोहम्मद सिराज आक्रमक मारा करत 4 विकेट्स पटकावल्या होत्या. त्यामुळेच इंग्लंडचा डाव गडगडला होता. 


 


यशस्वीने फटकेबाजी करत शतक झळकावले त्यामुळे टीम इंडियाचे सामन्यात पुनरागमन झाले होते.  दुसऱ्या दिवशी भक्कम सुरुवात सुरुवात घेऊन उतरलेल्या इंग्लंडचा डाव तिसऱ्या दिवशी पूर्णत: गडगडला. टीम इंडियाने इंग्लडला 319 धावांवरती गुंडाळले.  भारताकडून मोहम्मद सिरजने 4 तर रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या.