IND vs ENG 3rd Test :  21 वर्षाच्या युवा यशस्वी जायस्वाल यानं साहेबांची गोलंदाजी फोडून काढली. यशस्वी जायस्वाल याच्या द्विशतकाच्या बळावर भारताने इंग्लंडपुढे 557 धावांचे विराट लक्ष ठेवलेय. यशस्वी जायस्वाल यानं सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक ठोकले. यशस्वी जायस्वाल यानं 236 चेंडूत 12 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 214 धावा चोपल्या. यशस्वी जायस्वाल यानं इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या एकाच षटकात तीन षटकार लगावले. जगातील सर्वात अनुभवी गोलंदाजांची यशस्वी जायस्वाल यानं पिटाई केली. जेम्स अँडरसन आणि मार्क वूड यशस्वीपुढे फिके दिसले. 







सर्वाधिक षटकारांचा विक्रम -  


यशस्वी जायस्वालने भारतीय खेळाडू म्हणून कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्यानं नवज्योत सिंह सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांचा विक्रम मोडीत काढला. जायस्वालने एका डावात 12 षटकार लगावले.  नवज्योत सिंह सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांच्या नावावर प्रत्येकी 8 षटकार मारण्याचा विक्रम आहे. 1994 मध्ये लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सिद्धूने 8 षटकार ठोकले होते. यानंतर मयंक अग्रवालने 2019 मध्ये इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीच्या डावात फलंदाजी करताना 8 षटकार ठोकले होते.






यशस्वीचा शानदार फॉर्म - 


इंग्लंडविरोधोत जायस्वालच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. तीन कसोटी सामन्यात जायस्वाल यानं आतापर्यंत 22 षटकार लगावले आहे. या मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झालाय. याआधी, विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत जैस्वालने 209 धावांची शानदार खेळी केली होती. या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात जायस्वालच्या बॅटमधून ही शानदार खेळी विघाली होती. हैदराबादमध्ये  कसोटीतही उत्कृष्ट फॉर्म दाखवला, जिथे भारतीय सलामीवीराने पहिल्या डावात 80 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या डावात त्याला केवळ 15 धावा करता आल्या.


यशस्वी जायस्वालचं सलग दुसरं द्विशतक - 


अवघी सातवी कसोटी खेळणाऱ्या 21 वर्षीय यशस्वी जायस्वाल यानं सलग दुसरं द्विशतक ठोकलं. यशस्वी जायस्वाल यानं पहिल्या चेंडूपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मार्क वूड आणि जेम्स अँडरसन यासारखे अनुभव गोलंदाजही यशस्वी जायस्वालसमोर फिके पडले. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जायस्वाल यानं शानदार शतक ठोकल. पण दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. पण चौथ्या दिवशी पुन्हा तो मैदानावर परतला. जिथे खेळ सोडला तेथूनच त्यानं सुरुवात केली. त्यानं गोलंदाज कोण आहे ? याचा विचार केला नाही फक्त चेंडू फटकावलं. यशस्वी जायस्वाल यानं 236 चेंडूत 214 धावांची खेळी करत माघारी परतला. यशस्वीनं आपल्या या खेळीमध्ये 12 षटकार आणि 14 चौकार ठोकले. एकाच डावात सर्वाधिक षटकार लगावण्याचाही विक्रम यशस्वीच्या नावावर झाला आहे.