IND vs ENG 3rd T20: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा युवा फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) एक हाती झुंज दिली. त्यानं 55 चेंडूत 117 धावा ठोकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला.  या सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) सूर्यकुमारच्या फलंदाजीचं कौतूक केलं. याशिवाय भारताच्या पराभवाचंही कारण सांगितलं. 


सूर्यकुमार यादववर कौतुकाचा वर्षाव
"इंग्लंडनं दिलेल्या लक्ष्य गाठण्यासाठी भारतानं चांगले प्रयत्न केले. परंतु, काही धावांनी आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. आम्ही केलेल्या प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं चमकदार खेळी केली. तो टी-20 क्रिकेट खेळणं खूप पसंत करतो. त्याच्याजवळ उत्कृष्ट शॉट्स आहेत. जेव्हापासून तो भारतीय संघात सामील झालाय, तेव्हापासून त्याच्या खेळात दिवसेंदिवस सुधारणा होताना दिसत आहे." 


रोहितनं सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण
"इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मलान आणि लियाम लिव्हिंगस्टोनची भागीदारी हे भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण मानलं जातंय. डेव्हिड मलान आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या भागेदारीनं भारतीय संघाला बॅकफूटवर ढकललं. सध्या भारतीय संघात सर्व काही ठिक आहे. पण आम्हाला आरामात बसायचं नाही. आम्हाला प्रत्येक खेळात स्वतःला सिद्ध करावा लागेल. आजच्या सामन्यातून खूप काही शिकायला मिळाले."


तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव
नॉटिंगहॅमच्या ट्रेन्ट ब्रिज येथे काल खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात भारताला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर 216 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारताला 20 षटकात 198 धावा करता आल्या. या सामन्यात भेदक गोलंदाजी करणाऱ्या रीस टोप्लेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. त्यानं या सामन्यात चार षटकात 22 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. 


हे देखील वाचा-