India vs Banglades 2nd Kanpur Test Green Park Cricket Stadium : चेन्नईत विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता कानपूरमध्ये बांगलादेशला हरवण्याच्या तयारीत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय संघ मंगळवारी कानपूरला पोहोचला. दोन दिवसांनंतर कानपूरच्या ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे, परंतु त्याआधीच चिंतेची बातमी आली आहे. कानपूर टेस्ट रद्द होण्याची चर्चा आहे. या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.....


पीडब्ल्यूडीने स्टेडियमला म्हटले ​​धोकादायक...


खरंतर, उत्तर प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमच्या स्टँडच्या संरचनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यामुळे उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनला तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा घालावी लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूपी सरकारच्या पीडब्ल्यूडी विभागाने ग्रीन पार्क स्टेडियमची बाल्कनी धोकादायक म्हणून घोषित केली आहे. PWD अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, सामन्यादरम्यान हे स्टँड पूर्ण क्षमतेने सहन करू शकणार नाही आणि ते खाली पडू शकते.


यूपी सरकारच्या पीडब्ल्यूडी विभागाच्या इशाऱ्यानंतर यूपीसीएचा तणाव वाढला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीसाठी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडून बाल्कनी सी स्टँडसाठी निम्म्याहून कमी तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातील.


UPCA सीईओ अंकित चॅटर्जी यांनी एका मीडिया आउटलेटला पुष्टी केली आहे की, खबरदारी म्हणून बाल्कनी सी स्टँडसाठी फक्त 1700 तिकिटे विकली जातील, तर त्याची क्षमता 4800 आहे. अंकित चॅटर्जी यांनी असेही सांगितले की, पीडब्ल्यूडीने काही समस्या मांडल्या असून पुढील काही दिवस दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. चाहत्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


ग्रीन पार्क सरकारच्या मालकीचे


ग्रीन पार्क स्टेडियम उत्तर प्रदेश सरकारच्या क्रीडा विभागाच्या मालकीचे आहे. ते थेट UPCA किंवा BCCI अंतर्गत नाही, त्यामुळे PWD अधिकारी स्टेडियमची पाहणी करण्यासाठी आले होते. सामना रद्द करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आणि अशी शक्यता नाही, कारण उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने आधीच धोकादायक मानल्या गेलेल्या स्टँडमधील चाहत्यांची संख्या कमी केली आहे.


टीम इंडियाने सराव केला सुरू 


भारतीय क्रिकेट संघ कानपूरला पोहोचला असून बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी सरावाला सुरुवात केली आहे. विराट कोहली आणि अनेक खेळाडूंच्या सरावाचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत.


हे ही वाचा -


Ind vs Ban 2nd Test : खेळपट्टीचा रंग बघून टीम इंडियाने बदला प्लॅन; सिराजचा पत्ता कट, 'ही' असणार प्लेइंग-11