IND vs BAN 1st Test Win : भारतानं बांगलादेश दौऱ्यातील (India tour of bangladesh) कसोटी मालिकेची विजयानं सुरुवात केली आहे. पहिला कसोटी सामनाा तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं (Ind vs Ban) मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी भारतानं सर्व आगामी कसोटी सामने जिंकणं महत्त्वाचं असल्याने त्याची सुरुवात चांगली झाली आहे. सामन्यात भारतानं पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या 90 तर श्रेयस अय्यरच्या 86 धावांच्या जोरावर 404 धावसंख्या स्कोरबोर्डवर लावली. ज्यानंतर कुलदीपनं कमाल गोलंदाजी करत 5 तर सिराजनं 3 विकेट घेत अवघ्या 150 धावांवर बांगलादेशचा डाव आटोपला. ज्यानंतर पुजारा आणि गिलच्या शतकाच्या जोरावर भारतानं 258 धावा करत दुसरा डाव घोषित केला आणि 513 धावांचं मोठं आव्हान बांगलादेशला दिलं. जे पूर्ण करताना बांगलादेशनं झुंज दिली पण अखेर कुलदीप आणि अक्षर यांच्या फिरकीसमोर बांगलादेशचा संघ 324 धावांवर सर्वबाद झाला आणि भारत 188 धावांनी सामना जिंकला.


ट्वीट-






पुजारा-श्रेयसची भागिदारी भारताच्या 404 धावा


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खास झाली नाही. कॅप्टन केएल राहुल (22 धावा) आणि शुभमन गिल (20 धावा) स्वस्तात माघारी परतले. विराटही एक धाव करुन बाद झाला. भारतानं 48 धावांवर तीन विकेट्स गमावल्यानंतर चेतेश्वर पुजारानं संघाचा डाव सावरला. ऋषभ पंतयानेही 46 धावांची तडाखेबाज खेळी केली. तो बाद होताच  श्रेयस अय्यरनं पुजाराची साथ दिली. ज्यानंतर दोघांनी एक चांगली भागिदारी केली. पुजाराने 90 तर श्रेयसनं 86 रन केले. हे दोघेही बाद झाल्यावर भारत सर्वबाद लवकरच होईल असं वाटत होतं. पण त्यानंतर रवीचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवनं संघाचा डाव सावरला. रविचंद्रन अश्विनं 58 तर, कुलदीप यादवनं 40 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळं भारतानं पहिल्या डावात 404 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. बांगलादेशकडून तैजूल इस्लाम आणि मेहंदी हसननं प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. तर, इबादत हुसेन आणि खालीद अहमदच्या खात्यात एक-एक विकेट जमा झाली.


कुलदीपची कमाल गोलंदाजी


भारताला 404 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशचा संघ खास कामगिरी करु शकला नाही, अवघ्या 150 धावांवर त्याचा पहिला डाव संपला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं पहिल्याच चेंडूवर नजमूल शांतोच्या रुपात बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर उमेश यादवनं चौथ्या षटकात यासीर अलीची विकेट्स घेतली. लिटन दासही स्वस्तात माघारी परतला. बांगालादेशकडून मुशफिकूर रहीमनं सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. याशिवाय, शाकीब अल हसन (3 धावा), नुरुल हसन (16 धावा) आणि तैजूल इस्लाम शून्यावर बाद झाला. बांगलादेशच्या संघानं दुसऱ्या दिवसाखेर 8 विकेट्स गमावून 133 धावा केल्या.  त्यानंतर तिसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात आलेला बांगलादेशच्या संघाला फक्त 17 धावा करता आल्या. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात बांगलादेशचा संघ 150 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तर, मोहम्मद सिराजनं तीन विकेट्स मिळवल्या. याशिवाय, उमेश यादव आणि अक्षर पटेलच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली. 


पुजारा-गिलचं शतक


बांगलादेशलचा 150 धावांत सर्वबाद करु 254 धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात दोन विकेट्स गमावून 258 धावा केल्या. भारताच्या दुसऱ्या डावात केएल राहुल 23 धावा करु बाद झाला. पण त्यानंतर शुभमन गिलनं पुजारासोबत दमदार फलंदाजी केली, गिलनं 110 तर चेतेश्वर पुजारानं 102 धावा करत जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताची धावसंख्या 500 पार पोहचवण्यास मदत केली. ज्यानंतर भारतानं डाव घोषित कर 513 धावांचे लक्ष्य बांगलादेशसमोर ठेवले. मेहंदी हसन आणि खालीद अहमद यांना प्रत्येकी एक-एक विकेट या डावात मिळाली.


कुलदीप-अक्षरच्या फिरकीसमोर बांगलादेश गारद


तब्बल 513 धावांचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेश संघानं एक चांगली झुंज दिली पण अखेर कुलदीप आणि अक्षर यांच्या फिरकीसमोर बांगलादेशचा संघ 324 धावांवर सर्वबाद झाला आणि भारत 188 धावांनी सामना जिंकला. दुसऱ्या डावात बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. झाकीर हसन आणि नजमूल शांतो यांनी एक शतकी चांगली भागिदारी उभारली. पण शांतो 67 धावांवर बाद झाल्यावर पुढील गडीही स्वस्तात बाद झाले. लिटन दास (19), यासिर अली (5) आणि मुशफिकूर (23) यांनी झाकिरला साथ दिली नाही आणि 100 धावा करु झाकिरही तंबूत परतला. कर्णधार शाकिब अल् हसन यानं चांगली झुंज दिली पण कुलदीपच्या फिरकीसमोर 84 धावांवर तोही बाद झाला.अखेरचे फलंदाजही कमाल करु शकले नाहीत आणि 324 धावांवर बांगलादेशचा संघ सर्वबाद झाला, ज्यामुळं भारतानं सामना 188 धावांनी जिंकला. या डावात अक्षरनं सर्वाधिक 4 कुलदीपनं 3 तर सिराज, यादव आणि अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. सामनावीर म्हणून सर्व डावात कमाल गोलंदाजी तर पहिल्या डावात महत्त्वूर्ण फलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादवला गौरवण्यात आलं.


हे देखील वाचा-