India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ग्रीन पार्क, कानपूर येथे खेळला जात आहे. पहिला कसोटी सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे टीम इंडियाचं WTC च्या फायनलचं समीकरण बिघडण्याची शक्यता आहे. कानपूरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला असतानाही बीसीसीआयने सदर ठिकाणी सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बीसीसीआयची ही एक चूक टीम इंडियाला आगामी काळात महागात पडण्याची शक्यता आहे.
पहिल्या दिवसापासून पावसाची बँटिंग-
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात फक्त एक दिवसाचा खेळ झाला आहे. पावसामुळे कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. तर आज तिसरा दिवसाचा खेळही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 27 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सामन्यात पहिल्या दिवशीही पावसाने हजेरी लावली होती. कसोटीमधील दुसरा आणि तिसरा दिवस एकही चेंडू न टाकता रद्द झाला आहे.
WTC च्या फायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाचं समीकरण काय?
टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 10 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 7 जिंकले आहेत आणि विजयाची टक्केवारी 71.67 आहे. बांगलादेशनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. त्यामुळे आगामी काळात टीम इंडियासाठी खडतर प्रवास असणार आहे. त्यासाठी बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकल्यास टीम इंडियाला खूप फायदेशीर ठरेल.
कानपूरमधील कसोटी सामना रद्द झाल्यास...
कानपूरमधील कसोटी सामना जिंकल्यास टीम इंडियाला 12 गुण मिळतील. तर हा सामना पावसामुळे रद्द झाली तर टीम इंडियाला फक्त 4 गुण मिळतील. सामना रद्द झाल्याने टीम इंडियाचा विजयाचा टक्काही कमी होणार आहे. मात्र, यानंतरही टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी असेल. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी कमी झाली असली तरी, इतर संघांना अजूनही चांगली विजयाची टक्केवारी गाठण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आपापले सर्व सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीची शर्यत अधिक आव्हानात्मक बनवू शकतात.
WTC च्या गुणतालिकेची सध्यस्थिती-
सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलनुसार, टीम इंडिया 71.67% गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, बांगलादेश 39.29% गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण दिले जातील. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या खात्यात केवळ 68.18% गुण शिल्लक राहतील. कानपूर कसोटीतील खेळपट्टीच्या अहवालानुसार, टीम इंडियाच्या विजयाची शक्यता जास्त आहे, जर भारताने दुसरी कसोटी जिंकली तर त्यांच्या खात्यात 74.24% गुण होतील.