IPL 2025 New Rule: आयपीएल 2025 च्या (IPL 2025) मेगा लिलावासाठी सर्वंच संघांनी तयारी सुरु केली आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात अनेक बदल पाहायला मिळतील. तर अनेक खेळाडू संघ बदलताना दिसतील. मेगा लिलावाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी आयपीएलबाबत एक महत्वाची घोषणा केली आहे. आयपीएल संचालन परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (28 सप्टेंबर) पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
आयपीएल (IPL 2025) खेळणाऱ्या खेळाडूला प्रत्येक सामन्यासाठी 7.5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच आयपीएलच्या एका हंगामात सर्व साखळी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त 1 कोटी 05 लाख रुपये बोनसही देण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील खेळाडू आणखी मालामाल होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक संघाला 12.60 कोटी रुपये एका सत्रासाठी सामना शुल्क मंजूर करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचेही जय शाह यांनी सांगितले.
पाच खेळाडूंचे रिटेन्शन-
सर्व 10 संघांना जास्तीत जास्त 5 खेळाडूंना संघात कायम करण्याची तसेच यंदाच्या लिलावात 'एक राइट टू मॅच कार्ड'ही वापरण्याची परवानगी देण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एखाद्या संघाने 5 खेळाडूंना कायम केले, तर त्यांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागणार आहे. पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे 18, 14 आणि 11 कोटी रुपये मोजावे लागतील. तसेच जर संघांनी आणखी दोन खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना 18 आणि 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
...तर दोन वर्षांची बंदी-
आयपीएलच्या गेल्या अनेक मोसमात लिलावात निवड झाल्यानंतर काही खेळाडूंनी हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळण्यास नकार दिल्याचे दिसून येत होते. आता याबाबतही एक नियम जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लिलावात एखादा खेळाडू निवडला गेला आणि नंतर त्याने खेळण्यास नकार दिला तर त्या खेळाडूला स्पर्धेत भाग घेण्यास बंदी घालण्यात येईल आणि खेळाडूंच्या लिलावातही 2 वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे.