Ind vs Ban 2nd Test: भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. कानपूर येथे हा सामना सुरु असून पहिल्या दिवसअखेर बांगलादेशने 3 विकेट्स गमावत 107 धावा केल्या. पहिल्याच दिवेशी या सामन्यावर पावसाचे वर्चस्व राहिले. त्यामुळे फक्त 35 षटकांचा खेळ झाला. पहिल्या दिवसांत चर्चा रंगली ती म्हणजे बांगलादेशच्या एका चाहत्याची.
सोशल मीडियावर सामना (India vs Bangladesh) बघायला आलेल्या बांगलादेशच्या एका चाहत्याला धक्काबुक्की करण्यात आली, असं समोर येत होते. बांगलादेशी क्रिकेट चाहता टायगर रॉबीला काही लोकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मात्र बांगलादेशच्या या चाहत्यासोबत कोणतेही गैरवर्तन झाले नाही, असं मैदानावरील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसादरम्यान ग्रीन पार्क स्टेडियममध्ये बांगलादेशचा एक चाहता आजारी पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, याआधी त्याच्यासोबत भारतीय चाहत्यांनी धक्काबुक्की केल्याचे वृत्त पसरले होते. या चाहत्याने स्वतःची ओळख 'सुपर फॅन रॉबी' अशी सांगितली. तो वाघाच्या पोशाखामध्ये स्टेडियममध्ये उपस्थित राहून बांगलादेश संघाला जोरदार पाठिंबा देत होता. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याने एका व्हिडीओद्वारे सांगितले की, 'मी आजारी पडलो होतो आणि पोलिसांनी मला रुग्णालयात आणले. आता मला चांगले वाटत आहे. माझे नाव रॉबी आहे आणि मी बांगलादेशहून आलोय.
पोलिसांनी काय माहिती दिली?
सदर प्रकरणाबाबत कल्याणपूरचे एसीपी अभिषेक पांडे यांनी सांगितले की, 'रॉबीला तत्काळ वैद्यकीय सेवा मिळाली. मात्र, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही. भारत-बांगलादेश कसोटी सामन्यादरम्यान एका प्रेक्षकाची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी नेले. आता तो ठीक असून, त्याच्या संपर्कात एक अधिकारी आहे: जेणेकरून गरज पडल्यास त्याला मदत होऊ शकेल.
सामना कसा राहिला?
पावसामुळे कानपूरमधील कसोटी सामना थांबवण्यात आला आहे. या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 35 षटकात 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. मुशफिकुर रहीम (6 धावा) आणि मोमिनुल हक (40 धावा) मैदानावर आहेत. आतापर्यंत वेगवान गोलंदाज आकाशदीपने टीम इंडियासाठी सर्वाधिक 2 विकेट घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विनला एक विकेट मिळाली.
भारतीय संघाची प्लेइंग-11: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांग्लादेश संघाची प्लेइंग-11: शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.