Shubman Gill flop show in Chennai test 1st innings : बांगलादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जात असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो आतापर्यंतचा अत्यंत योग्य निर्णय असल्याचे सिद्ध झाले आहे. या सामन्यात भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले तर शुभमन गिल खाते न उघडता बाद झाला. तिघांनाही हसन महमूदने आपले बळी बनवले.
टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हसन महमूदने गिलला लिटन दासकरवी झेलबाद केले. गिल शून्यावर बाद होण्याची या वर्षातील ही तिसरी वेळ आहे. आता 25 वर्षीय फलंदाजाच्या खराब कामगिरीवर चाहते संतापले आहेत. सोशल मीडियावर काही युजर्स त्याला भारताचा बाबर आझम म्हणत आहेत, तर काही युजर्स आगरकर-जय शहाच्या सेटींगमुळे संघात तो संघात असल्याचे म्हटले आहेत.
शुबमनला आपले खाते उघडता न येण्याची या वर्षातील कसोटीतील ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी जानेवारीत हैदराबाद कसोटी आणि फेब्रुवारीत विशाखापट्टणम कसोटीत त्याला इंग्लंडविरुद्ध खातेही उघडता आले नव्हते. शुभमन कसोटीत पाचव्यांदा खातेही न उघडता बाद झाला आहे. उर्वरित दोन वेळा त्याला इंग्लंडविरुद्ध खातेही उघडता आले नाही. शुभमनने मागील चार कसोटी डावांमध्ये खूप धावा केल्या होत्या आणि या मालिकेत त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. शुभमनच्या शेवटच्या 10 डाव - 0, 110, 52* 38, 91, 0, 104, 34, 0 आणि 23 धावा. मात्र, बांगलादेशविरुद्ध तो विशेष काही करू शकला नाही.
शुभमनने आतापर्यंत 47 कसोटी डावांमध्ये चार शतके आणि सहा अर्धशतकांच्या मदतीने 1492 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 35.52 इतकी आहे. शुभमनचा कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 128 धावा आहे. शुभमनला कसोटीत पाचही वेळा भारतात खाते उघडता आले नाही. विशेष म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याचे तीन डक आले आहेत.
पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
भारत बांगलादेश कसोटीच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र संपले. फलंदाजी करताना टीम इंडियाने पहिल्या सत्रात 23 षटके खेळून 88/3 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहेत. जैस्वालने 62 चेंडूत 37 तर पंतने 44 चेंडूत 33 धावा केल्या आहेत. एकवेळ भारताने 34 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. आता भारताला यशस्वी आणि पंत यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
हे ही वाचा -