IND Vs AUS | ब्रिस्बेन कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे 54 धावांची आघाडी होती. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस हे खेळाडू खेळपट्टीवर आहेत. आघाडी आणि खेळपट्टीवर असणाऱ्या तगड्या खेळाडूंच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या दिवसाचा खेळ सुरु करणार आहेत. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीचा तिसरा दिवस गाजवला म्हणजे, भारतीय संघातील शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरनं या दोन तरुण खेळाडूंनी.


ब्रिस्बेन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची सुरुवात फार चांगली दिसून आली नाही. तिसऱ्या दिवशी यजमानांचं या सामन्यावर वर्चस्व दिसून आलं. पण वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी जबाबदारी खेळी करत भारतीय संघाचा भार आपल्या खांद्यावर घेतला. शार्दुलनं 67 धावा करत आणि सुंदरनं 62 धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं. या दोघांनी मिळून 118 धावांची भागीदारी केली. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाकडे केवळ 33 धावांची आघाडी आहे.


विराट कोहलीचं ट्वीट :





टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं ठाकूर आणि सुंदरच्या खेळीचं विशेष कौतुक केलं. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शार्दुल ठाकूरचं कौतुक विराट कोहलीनं मराठीत केलं. विराटनं ट्वीट केलं की, "वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर, तुम्ही दोघांनी अतिशय मोक्याच्या वेळी उत्तम खेळी केलीत. स्वत:च्या खेळीच्या जोरावर तुम्ही सामना भारतासाठी पुन्हा जिवंत केलात. हीच कसोटी क्रिकेटची खरी गंमत आहे. वॉशिंग्टन तू पदार्पणाच्या सामन्यात दमदार कमाल केलीस आणि तुला परत मानला रे ठाकूर!"


दरम्यान, भारतीय संघाची पहिली खेळी सर्वबाद 336 धावांवर गुंडाळल्यावर ऑस्ट्रेलियाकडे 33 धावांची आघाडी होती. ज्यानंतर लगेचच यजमान संघ दुसऱ्या खेळीसाठी मैदानात आला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या वतीनं डेव्हिड वॉर्नर आणि हॅरिस मैदानात दाखल झाले. सुरुवातीच्या षटकांसाठी भारताकडून सिराज आणि नटराजन यांच्यावर गोलंदाजीची धुरा देण्यात आली. परिणामी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे 54 धावांची आघाडी होती.


महत्त्वाच्या बातम्या :