IND Vs AUS 4th Score Updates ब्रिस्बेन कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे 54 धावांची आघाडी होती. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस हे खेळाडू खेळपट्टीवर आहेत. आघाडी आणि खेळपट्टीवर असणाऱ्या तगड्या खेळाडूंच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या दिवसाचा खेळ सुरु करणार आहे. असं असलं तरीही कसोटीचा तिसरा दिवस खऱ्या अर्थानं गाजवला तो म्हणजे भारतीय संघातील शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूंनी.





ब्रिस्बेन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची सुरुवात फार चांगली दिसून आली नाही. तिसऱ्या दिवशी यजमानांचं या सामन्यावर वर्चस्व दिसून आलं चेतेश्वर पुजारा सुरुवातीलाच माघारी परतला आणि संघाला सुरुवातीच्याच काही तासांत पहिला झटका लागला. त्यामागोमागच रहाणेही तंबूत परतला. पुढं बऱ्याच अपेक्षा असताना चुकीचे फटके मारुन मयांक अग्रवाल आणि ऋषभ पंतही स्वस्तात माघारी गेले. अशा वेळी संघापुढच्या अडचणी आणखी वाढल्याचं पाहायला मिळत होतं. पण, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी जबाबदारीनं सारा भार आपल्या खांद्यावर घेतला.


शार्दुलनं 67 धावा करत आणि सुंदरनं 62 धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं. ज्यानंतर ठाकूर आणि सुंदर यांनी सातव्या विकेटसाठी भक्कम भागीदारी रचली. या दोन्ही खेळाडूंमध्ये 118 धावांची भागीदारी झाली आणि पाहता पाहता भारतीय संघ भक्कम स्थितीत दिसला.


भारतीय संघाची पहिली खेळी सर्वबाद 336 धावांवर गुंडाळल्यावर ऑस्ट्रेलियाकडे 33 धावांची आघाडी होती. ज्यानंतर लगेचच यजमान संघ दुसऱ्या खेळीसाठी मैदानात आला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या वतीनं डेव्हिड वॉर्नर आणि हॅरिस मैदानात दाखल झाले. सुरुवातीच्या षटकांसाठी भारताकडून सिराज आणि नटराजन यांच्यावर गोलंदाजीची धुरा देण्यात आली. परिणामी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे 54 धावांची आघाडी होती.