India vs Australia Fourth Test ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची सुरुवात फार चांगली दिसून आली नाही. तिसऱ्या दिवशी यजमानांचं या सामन्यावर वर्चस्व दिसून आलं चेतेश्वर पुजारा सुरुवातीलाच माघारी परतला आणि संघाला सुरुवातीच्याच काही तासांत पहिला झटका लागला. त्यामागोमागच रहाणेही तंबूत परतला. रहाणे परतल्यानंतर संघ काहीसा अडचणीत असल्याचं स्पष्टपणे कळून येत होतं.


यानंतर मयांक अग्रवाल आणि ऋषभ पंत यांच्यावर संघाच्या फलंदाजीची धुरा असतानाच या दोन्ही खेळाडूंना काही मिनिटांसाठी सूर गवसला. पण, हे चित्र फार काळ टीकू शकलं नाही. उपहारापूर्वी ही भागीदारी आणखी भक्कम होणार असं दिसतानाच उपहाराच्या अवघ्या काही मिनिटांनंतरच हेजलवूडच्या चेंडूवर चुकीचा फटका मारुन स्मिथच्या हाती झेल देत मयांक माघारी गेला. त्यावेळी संघाची धावसंख्या 163 वर पोहोचली होती.


अग्रवालच्या माघारी जाण्यानंतर पंत काहीसा आक्रमक खेळी खेळताना दिसला. कसोटी सामन्यामध्ये त्याचा हा आक्रमकपणा काहीशी प्रशंसा मिळवून गेला. पण, गरजेच्या ठिकाणी चेंडू सोडणंही महत्त्वाचं असल्याची बाब जणू तो विसरला आणि काही मिनिटांच्या अंतरानं दोन चौकार ठोकल्यानंतर पुन्हा त्याच आवेगात फलंदाजी करण्यासाठी पंत पुढे सरसावला आणि 23 धावा झालेल्या असताना तोसुद्धा चुकीचा फटका मारत झेलबाद झाला. त्यावेळी भारतीय संघाच्या खात्यात 186 धावा होत्या.





Video | 'संदेसे आते हैं..., गाण्याचं नवं व्हर्जन सोशल मीडियावर तुफान व्हायरल

भारतीय संघातील मध्यमफळीला भक्कम करण्याच्या दिशेनं देत असतानाच पंत चूक करुन बसला. हेजलवूडच्या चेंडूवर ग्रीननं त्याचा झेल पकडला. ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी हे मोठं यश ठरलं पण, या विकेटमुळं भारतीय तंबूत मात्र निराशेचीच लाट पसरल्याची पाहायला मिळालं. सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात या खेळाडूंच्या आक्रमक आणि आवेगाच्या शैलीतील खेळावर टीकाही करण्यात आली. कसोटी क्रिकेटमध्ये संयमी खेळाला अधिक प्राधान्य आणि महत्त्वं दिलं जातं, हीच बाब या खेळाडूंनी जाणली पाहिजे असा सल्ला काही समालोचकांनी आणि विश्लेषकांनी दिला. कारण, त्यांच्या अतिघाईमुळं क्रमवारीत खालच्या स्थानावर फलंदाजीसाठी येणाऱ्या आणि संपूर्ण संघतील खेळाडूंच्या तणावात भर पडल्याचं चित्र ब्रिस्बेनमध्ये पाहायला मिळालं.