(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INDvsAUS 3rd Test: सिडनीमध्ये 42 वर्षांनंतर टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी
सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय फलंदाजांनी काही अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. मात्र टीम इंडियासाठी हे मैदान म्हणावं तसं लकी नाही. येथे सहा सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.
INDvsAUS 3rd Test Preview : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. मेलबर्न कसोटीच्या विजयासह टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. स्पिनर्ससाठी उपयुक्त ठरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या खेळपट्टीवर तिसर्या कसोटीत विजय मिळवण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ मेलबर्नच्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलिया संघाला दिलासा मिळाला आहे.
सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय फलंदाजांनी काही अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. मात्र टीम इंडियासाठी हे मैदान म्हणावं तसं लकी नाही. येथे सहा सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या मैदानावर भारताने एकमेव सामना जिंकला आहे, तोही 42 वर्षांपूर्वी. जर अजिंक्य रहाणेच्या संघाने सिडनीमध्ये इतिहास रचला आणि त्याला 2-1 अशी आघाडी मिळाली तर बॉर्डर-गावस्कर करंडक भारताकडेच राहील.
बुमराहच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी
मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव हे आघाडीचे गोलंदाज दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. या गोलंदाजांच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी मालिकेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. मोहम्मद सिराजप्रमाणे नवदीप सैनी याच्याकडून चांगल्या पदार्पणाची अपेक्षा आहे.
अश्विनने स्मिथला दोनदा बाद करण्याव्यतिरिक्त या मालिकेत 10 बळी घेतले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अश्विनच्या गोलंदाजीवर खेळताना अनेक अडचणी येत आहेत. पण डेव्हिड वॉर्नरने स्पष्ट केलंय की तो भारतीय गोलंदाजांविरूद्ध आक्रमक वृत्ती बाळगणार आहे.
रोहित शर्माचं कमबॅक
सर्व वादांनंतर रोहित शर्माची टीम इंडियामध्ये पुनरागमन करणं ही अत्यंत आनंददायक बातमी आहे. गेल्या काही वर्षांत टीम इंडियाचा सर्वात यशस्वी सलामीवीर असल्याचे सिद्ध झालेल्या मयंक अग्रवालच्या जागी रोहित शर्माची संघात निवड झाली. रोहित शर्माने नेटवर जोरदार सराव केला आहे.
IND vs AUS, Team India Announced | सिडनी कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, सैनी पदार्पण करणार
ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथच्या फॉर्ममध्ये परत येण्याची वाट पाहत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला ट्रॅव्हिस हेडसारख्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. ऑस्ट्रेलियन संघात विल पुकोवस्कीचं पदार्पणदेखील निश्चित मानलं जात आहे.
KL Rahul Ruled Out | केएल राहुल ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या उर्वरित दोन कसोटीमधून बाहेर
टीम इंडिया रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, नवदीप ठाकूर.
टीम ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर, विल पुकोवस्की, मार्नस लबूसचेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरून ग्रीन, टिम पेन (कर्णधार आणि विकेटकीपर), नॅथन लीन, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड.