India vs Australia 1st Test Playing XI पर्थ : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी पर्थमध्ये उद्यापासून सुरु होणार आहे. भारताचा नियमित कॅप्टन रोहित शर्मा पहिली कसोटी वैयक्तिक कारणामुळं खेळणार नाही. पर्थ कसोटीत यशस्वी जयस्वाल सोबत कोण सलामीला येणार याबाबत उत्सुकता कायम आहे.  पर्थ कसोटीमध्ये वेगवान गोलंदाजांना फायदा मिळू शकतो. यासाठी भारतीय संघ कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारत चार वेगवान गोलंदाजांसह पर्थ कसोटीत मैदानात उतरेल असा अंदाज आहे.  


केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल सलामीला येणार?


रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात 24 नोव्हेंबरला पर्थमध्ये दाखल होणार आहे. केएल राहुल रोहित शर्माच्या जागी सलामीला येऊ शकतो. केएल राहुलनं यापूर्वी भारतीय संघाकडून सलामीला आला होता. भारताच्या डावाची सुरुवात करण्याचा अनुभव केएल राहुलला असल्यानं त्याला पुन्हा सलामीला पाठवलं जाऊ शकते. केएल राहुलनं 75 डावांमध्ये भारताच्या डावाची सुरुवात केली आहे. केएल राहुलनं 75 डावांमध्ये 7 शतकं केली आहेत. तर, 12 अर्धशतकं देखील केली आहेत. केएल. राहुलनं सलामीला फलंदाजीला येताना 2551 धावा केल्या आहेत. शुभमन गिलच्या जागेवर भारतीय संघात देवदत्त पडिक्कल याला संधी मिळेल. इंग्लंड विरुद्ध त्यानं कसोटीत पदार्पण केलं होतं, त्यानं 65 धावा केल्या होत्या. चौथ्या स्थानावर विराट कोहली फलंदाजीला येण्याची शक्यता आहे.   


दोन विकेटकीपरला संधी मिळण्याची शक्यता


शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्यानं मधल्या फळीतील फलंदाजी क्रमात देखील बदल शक्य आहेत. रोहित शर्मा संघात असता तर केएल राहुल पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजी करताना पाहायला मिळाला असता. आता केएल राहुल सलामीला फलंदाजीला येणार आहे. रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल दोघेही संघात असतील, अशी शक्यता आहे. ध्रुव जुरेलला सहाव्या स्थानावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.    


टीम इंडिया कोणत्या गोलंदाजांना संधी देणार?


पिच क्यूरेटर आइसॅक मॅकडोनाल्ड यांनी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना फायदेशीर ठरेल, अशी असेल, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं दोन्ही संघ 4 वेगवान गोलंदाज आणि एका फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतात. भारतीय संघात जसप्रीत बुमराह सोबत मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळेल. याशिवाय वेगवान गोलंदाज म्हणून नितीश कुमार रेड्डी हा देखील संघात असू शकतो. आर. अश्विनला फिरकी पटू म्हणून स्थान मिळतं का ते पाहावं लागेल. 


भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन XI: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, आर.अश्विन, जसप्रीत बुमराह (कॅप्टन), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.


इतर बातम्या :


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला जाणार? कॅप्टन जसप्रीत बुमराहनं दिली मोठी अपडेट