अश्विनचा विकेटचा षटकार, ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपला, भारताची आश्वासक सुरुवात
IND vs AUS, 4th Test : उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून आर अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या.
IND vs AUS, 4th Test- Innings Highlights : उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांच्या दमदार शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून आर अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने बिनबाद 36 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 16 तर शुभमन गिल 17 धावांवर खेळत आहेत. भारत अद्याप 444 धावांनी पिछाडीवर आहे.
उस्मान ख्वाजा याने 180 धावांची संयमी खेळी केली. उस्मान ख्वाजा याने 422 चेंडूचा सामना करताना 21 चौकारांच्या मदतीने 180 धावा केल्या. उस्मान ख्वाजाशिवाय कॅमरुन ग्रीन याने 114 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ग्रीन याने 18 चौकार लगावले. त्याशिवाय मर्फीने 34 धावांची निर्णायाक खेळी केली. तर ट्रविस हेड 32, स्मिथ 38 यांनीही मोलाचं योगदान दिले. उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांची द्विशतकी भागिदारी हे ऑस्ट्रेलियाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. ख्वाजा आणि ग्रीन यांनी 358 चेंडूत 208 धावांची भागिदारी केली. मागील दहा ते 15 वर्षातील भारतामधील ही सर्वात विदेशी संघाची सर्वात मोठी भागिदारी आहे. त्याशिवाय लायन आणि मर्फी यांनी नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी करत भारताची डोकेदुखी वाढवली.
भारताची गोलंदाजी कशी राहिली ?
अहमदाबाद येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने जवळपास दोन दिवस फलंदाजी केली. उस्मान ख्वाजा आणि ग्रीन यांनी खेळपट्टीवर पाय रोवले होते. ते विकेट टाकत नव्हते... विकेट पडत नाही, हे लक्षात येताच भारतीय गोलंदाजांनी धावांवर अंकूश ठेवला... भारतीय गोलंदाजांनी धावगती रोखली. त्यामुळे दोन दिवसाच्या फलंदाजीनंतरही ऑस्ट्रेलियाला 500 धावांचा पल्ला पार करता आला नाही. भारताकडून आर. अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. अश्विन याने जवळपास 48 षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 15 षटके निर्धाव टाकली. त्याशिवाय मोहम्मद शामी याने दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
रोहित-गिल यांची आश्वासक सुरुवात
ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या दिवसाअखेर भारताला फंलदाजी करावी लागली. अखेरच्या काही षटकात रोहित शर्मा आणि शुभमन गिल याने विकेट जाऊ दिली नाही. दोघांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेवा 10 षटकात 36 धावा गेल्या. रोहित शर्मा 33 चेंडूत 17 धावांवर खेळत आहे तर शुभमन गिल 27 चेंडूत 18 धावांवर खेळत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतासाठी निर्णायक ठरणार आहे. खेळपट्टी अद्याप फलंदाजीसाठी पोषक असल्यामुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल.