(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 21 धावांनी पराभूत, मालिकाही 2-1 ने गमावली
IND vs AUS : आजच्या सामन्यात जिंकणारा संघ सामन्यासह मालिकाही जिंकणार होता. पण भारताने सामना गमावल्यामुळे मालिकाही 2-1 अशा फरकाने गमावली आहे.विशेष म्हणजे 2019 नंतर पहिल्यांदाच भारताने घरच्या मैदानावर मालिका गमावली आहे.
IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना भारताने गमावला आहे. 270 धावाचं लक्ष्य गाठताना 248 धावांवर भारत सर्वबाद झाल्यामुळे 21 धावांनी सामना भारताला गमवावा लागला आहे. तीन सामन्यांच्या मालिकातील सलग दुसरा सामना भारताने गमावल्यामुळे मालिकाही भारताने गमावली आहे. विशेष म्हणजे 2019 नंतर पहिल्यांदाच भारताने घरच्या मैदानावर मालिका गमावली आहे. मागील चार वर्षात मालिका भारतानं घरच्या मैदानावर जिंकल्या असून दोन मालिका ड्राॅ देखील झाल्या आहेत.
What a game 💥
— ICC (@ICC) March 22, 2023
Australia clinch the decider in Chennai to bag the ODI series 2-1 🙌#INDvAUS | 📝: https://t.co/ugxHxHyT1z pic.twitter.com/5kU9WRDiYP
चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात खेळवल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 68 धावांची शानदार भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण नंतर हार्दिक पांड्याने हेडच्या रुपात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले, ज्याला त्याने 33 च्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथला शून्यावर आणि मिचेल मार्शला 47 धावांवर पांड्यानेच बाद केलं. मग वॉर्नर आणि लाबुशेन यांना पाठोपठ पॅव्हेलियनमध्ये पाठवून कुलदीप यादवने 138 धावांवर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत घालवला. मग मार्कस स्टॉइनिस आणि अॅलेक्स कॅरी यांनी 6व्या विकेटसाठी 54 चेंडूत 58 धावांची भागीदारी करत धावसंख्या 200 च्या जवळ नेली. स्टॉयनिस 25 आणि कॅरी 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर सीन अॅबॉट आणि अॅश्टन अगर यांनी 8व्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी करत धावसंख्या 250 पर्यंत नेली. शॉन अॅबॉटने 26, तर अॅश्टन अगरने 17 धावांची खेळी केली, तर मिचेल स्टार्क आणि अॅडम झाम्पा यांनी शेवटच्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 269 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
झाम्पा ठरला दुसऱ्या डावात सरस
270 धावाचं लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या भारताने सुरुवात चांगली केली. विशेष म्हणजे भारत हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण तेव्हाच ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू अॅडम झाम्पा याने पांड्या आणि जाडेजा या महत्त्वाच्या खेळाडूंना बाद करत सामना फिरवला. त्याने सामन्यात एकूण महत्त्वाचे 4 विकेट्स घेतले. सर्वात आधी भारताचे सलामीवीर रोहित आणि शुभमन यांनी चांगली सुरुवात केली. रोहित 30 मग शुभमन 37 धावांवर बाद झाल्यावरही विराटनं डाव सावरला होता. तो 54 धावा आज करु शकला. त्याशिवाय राहुलनंही 32 धावा केल्या पण अक्षर 2 तर सूर्यकुमार शून्यावर बाद झाला, ज्याचा भारताला मोठा तोटा झाला. पण या सर्वानंतरही पांड्या आणि जाडेजा जोडीने सामना जिंकवत आणला होता. पण पांड्या 40 आणि जाडेजा 18 धावांवर झाम्पाच्या गोलंदाजीवर बाद झाले. ज्यानंतर शमी 14, कुलदीप 6 आणि सिराज 3 धावा करु शकले. पण 49.1 षटकांत 248 धावांवर भारत सर्वबाद झाला आणि सामना भारताने 21 धावांनी गमावला.
हे देखील वाचा-