Rohit Sharma Support Suryakumar Yadav : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला 2-1 ने पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) ही मालिका फारच वाईट गेली. तिन्ही सामन्यांपैकी प्लेईंग इलेव्हनमध्ये समाविष्ट असलेल्या सूर्याला संपूर्ण मालिकेत एकही धाव करता आली नाही. तिन्ही सामन्यात सूर्या गोल्डन डकचा बळी ठरला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि तिसऱ्या सामन्यात अॅश्टन अगरने त्याला गोलंदाजी करत बाद केलं. पण या सगळ्यानंतरही भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फलंदाजाच्या समर्थनात दिसला.


सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “त्याने मालिकेत फक्त तीन चेंडू खेळले. मला माहित नाही की आपण काय पाहू शकता. पण त्याला मिळालेले हे तिन्ही चेंडू फार उत्तम होते. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो बाद झाला तेव्हाचा चेंडू तितका खास नसला तरी त्याने फक्त चुकीचा शॉट निवडला. कदाचित तो पुढे आला असावा." दरम्यान सूर्याला तिसऱ्या वनडेमध्ये इतक्या खाली का पाठवण्यात आलं याचाही खुलासा भारतीय कर्णधार शर्माने केला. रोहित शर्मा म्हणाला, “तो खूप चांगल्याप्रकारे फिरकी खेळतो, म्हणूनच आम्ही त्याला थांबवून शेवटच्या 15 ते 20 षटकांची भूमिका देऊ इच्छित होतो. मात्र या मालिकेत तो केवळ तीन चेंडू खेळू शकला हे फार दुर्दैवी होते. हे कुणासोबतही होऊ शकते. कार्यक्षमता, गुणवत्ता नेहमीच असते. तो सध्या त्याच्या वाईट टप्प्यातून जात आहे.


मास्टर ब्लास्टरच्याही नावे आहे 'गोल्डन डक'चा विक्रम 


टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईत खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅस्टन अगरनं पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं. सूर्या आऊट झाला अन् त्यानं 'गोल्डन डक'च्या हॅट्रिकचा विक्रम आपल्या नावावर रचला. मात्र, सूर्याच्या आधीही अनेक भारतीय फलंदाजांनी वनडेमध्ये गोल्डन डकची हॅट्रिक केली आहे. या यादीत सर्वात मोठं नाव आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. जो 1994 मध्ये सलग तीन एकदिवसीय सामन्यांत शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर अनिल कुंबळे, झहीर खान, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनीही वनडेत शून्यावर बाद होण्याची हॅट्ट्रिक रचली आहेच.


हे देखील वाचा-