Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा हंगाम सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, पण त्याआधीच कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील, अशी माहिती समोर येत असल्याने या परिस्थितीत तो या संपूर्ण आयपीएलच्या हंगामातून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित होत आहे.


त्यामुळे आता कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला आता हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांच्या संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा करावी लागणार आहे, तिथे त्यांना श्रेयस अय्यरच्या जागी बदली खेळाडू देखील निवडावा लागेल. 2022 च्या लिलावादरम्यान केकेआर संघाने 12.25 कोटी रुपयांमध्ये अय्यरला आपल्या संघात समाविष्ट केले होते. पण आता तो संघात नसल्यास कोणाला कॅप्टन करणार ही चर्चा होत असून त्या 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ जे अय्यरच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सर्वात योग्य खेळाडू आहेत.


1.शकिब अल हसन


जागतिक क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जाणारा बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शकीब अल हसन या जबाबदारीसाठी सर्वात योग्य खेळाडू ठरू शकतो. शाकिबला आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे.


2. सुनील नारायण


2012 च्या आयपीएल हंगामापासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा भाग असलेला सुनील नारायण संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा एक चांगला पर्याय आहे. सुनीलला इतर खेळाडूंपेक्षा फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याचा अनुभवही जास्त आहे आणि तो KKR च्या दुसऱ्या T20 लीगमध्ये खेळणाऱ्या संघांचाही एक भाग आहे. याशिवाय जेव्हा संघ आयपीएलमध्ये 2 वेळा विजेते ठरला तेव्हा सुनीलने बॅट आणि बॉल या दोन्ही बाजूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.


3.शार्दुल ठाकूर


केकेआरकडून शार्दुल ठाकूरचा हा पहिलाच हंगाम असेल, ज्यामध्ये भारतीय खेळाडू असल्याने तो संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडू शकतो. बॉल आणि बॅटने शार्दुलसाठी शेवटचा सीझन खास नसला तरी या मोसमात कोलकाता नाइट रायडर्स संघात आल्यानंतर शार्दुलला चांगली सुरुवात करायला आवडेल.


IPL 2023 चे काही नवीन नियम


निर्धारित वेळेबाहेरील प्रत्येक षटकासाठी 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.
यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या चूकीच्या हालचालींमुळे डेड बॉल आणि 5 पेनल्टी रन्स मिळतील.
नाणेफेक झाल्यानंतर संघांनी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करायची आहे.
फ्रँचायझी 15-खेळाडूंच्या टीम शीटचे नाव देतील, ज्यामध्ये 4 पर्यायांपैकी एक इम्पॅक्ट खेळाडू असेल.


हे देखील वाचा-