IND vs SA, T20 World Cup 2024 Final:  हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले आहे. अखेरच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी सामना फिरवला. 24 चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला 26 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप यांनी भेदक मारा केला. त्याला जोड सूर्यकुमार यादवच्या फिल्डिंगची मिळाली. सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी डेविड मिलर याचा झेल घेतला. भारतीय संघाने 11 वर्षानंतर अखेर आयसीसी चषकावर नाव कोरलेय. टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. 


भारताने 177 धावांच्या आव्हानाचा यशस्वी बचाव केला. बार्बाडोसच्या मैदानात भारताने इतिहास रचला. 2007 नंतर भारतीय संघाने टी20 विश्वचषकावर नाव कोरलेय. विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या, बुमराह आणि अर्शदीप यांनी शानदार गोलंदाजी केली. रोहित शर्मा 2007 आणि 2024 विश्वचषक जिंकणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. 


भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत सामना फिरवला. अर्शधीप सिंह याने 4 षटकात 20 धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. जसप्रीत बुमराहने आपल्या षटकात फक्त 18 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याने 3 षटकात 20 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट घेतल्या. अक्षर पटेल याला एक विकेट मिळाली.



177 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी शानदार सुरुवात केली. रीजा हेंड्रीक्स आणि कर्णधार एडन माक्ररम लवकर तंबूत परतले. हेंड्रिक्स 4 आणि माक्ररम चार धावा काढून तंबूत परतले होते. आफ्रिका 12 धावांवर दोन बाद अशी स्थिती होती. पण त्यानंतर स्टब्स आणि डी कॉक यांनी आफ्रिकेच्या डावाला आकार दिला.दोघांनी चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. अक्षर पटेल याने स्टब्सचा अडथळा  दूर करत भारताला यश मिळवून दिले. पण त्यानंतर क्लासेन यानं डिकॉकच्या साथीने धावसंख्या वाऱ्याच्या वेगानं वाढवली.


क्लासाने आणि डी कॉक यांनी वादळी फलंदाजी करत सामना फिरवला. अर्शदीप सिंह याने क्विंटनला बाद करत विजयाचा दरवाजा तोडला. त्यानंतर हार्दिक पांड्याने धोकादायक क्लासेन याचा अडथळा दूर केला. 


क्लासेन यानं फक्त 27 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी केली. क्विंटन डी कॉक याने 31 चेंडूत 39 धावा जोडल्या. स्टब्स 31 धावा काढून बाद झाला. मिलरने 21 धावांचे योगदान दिले. अखेरच्या 24 चेंडूत आफ्रिकेला 26 धावांची गरज होती. हार्दिक पांड्याने भेदक मारा करत फक्त चार दावा दिल्या. क्लासेन याला या षटकात तंबूचा रस्ता दाखवला. त्यापुढील षटकात जसप्रीत बुमराहने फक्त दोन धावा दिल्या. 19 व्या षटकात अर्शदीप सिंह याने फक्त चार धवाा खर्च केल्या. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने 16 धावांचा यशस्वी बचाव केला.