Bismah Maroof return in Cricket: कोणत्याही महिला क्रिकेटपटूला आई झाल्यानंतर मैदानावर परतणे सहजासहजी शक्य नाही. पण वेळेनुसार बदलत अनेक महिला क्रिकेटपटू आई झाल्यानंतर कठोर मेहनत करत मैदानावर परतल्या आहेत. फक्त परतल्या नाहीत तर चॅम्पियन होऊन दाखवले आहे. सध्या पाकिस्तान संघाच्या महिला कर्णधाराचे विशेष कौतुक होत आहे. कारण, सहा महिन्याच्या चिमुकलीला घेऊन पाकिस्तानची कर्णधार मैदानावर उतरली होती. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयसीसीने हा फोटो ट्वीट केला आहे. 


सध्या न्यूझीलंडमध्ये महिला क्रिकेट विश्व कप (women world cup 2022)  सुरु आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तानचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्माह मारूफ (Bismah Maroof) आपल्या 6 महीन्याच्या मुलीसह न्यूझीलंडमध्ये आली आहे. रविवारी झालेल्या सामन्यासाठी बिस्माह माउंट माँगानुई येथे पोहचली तेव्हा तिच्या हातात सहा महिन्याची मुलगी होती. आयसीसीने (ICC) आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावर बिस्माहचा फोटो पोस्ट केला. यामध्ये ती आपल्या मुलीसोबत दिसत आहे. आयसीसीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, पाकिस्तानची कर्णधार भारताविरोधातील सामन्यासाठी तयार... 






या फोटोवर नेटकऱ्यांच्या लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका चाहत्याने तर 2022 मधील सर्वोत्कृष्ट फोटो असे हटले आहे. बिस्माह हिने ऑगस्ट 2021 मध्ये मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर आता पाकिस्तानच्या संघात पुनरागमन केलं आहे. 


भारतीय महिला संघानं पाकिस्तानला चारली धूळ, 107 धावांनी दणदणीत विजय -
न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाना पाकिस्तानच्या महिला संघाचा पराभव केला आहे. भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 107 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाकिस्तानला विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 137 धावांपर्यंत मजल मारता आली.