Shafali Verma Shweta Sehrawat U19 Team : भारताच्या अंडर 19 महिला संघाची कर्णधार शेफाली वर्मा (Shefali Verma) आणि सलामीवीर श्वेता शेहरावतसह प्रतिभावान लेग-स्पिनर पार्श्वी चोप्रा या भारताच्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक विजेत्या संघाच्या तीन सदस्यांचा सोमवारी आयसीसीच्या वर्ल्डकप संघात समावेश करण्यात आला. शेफालीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने रविवारी फायनलमध्ये इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करून पहिला अंडर-19 T20 विश्वचषक जिंकला. हे महिला क्रिकेटमधील भारताचे पहिले विश्वविजेतेपद आहे.


सामन्याचा विचार केला तर डावाची सुरुवात करताना शेफालीने वेगवान फलंदाजीसोबतच एक कर्णधार म्हणून आपल्या दमदार नेतृत्त्वाचेही दर्शन घडवले. तिने यूएईविरुद्ध 34 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांसह 78 धावांची तुफानी खेळी केली. 172 धावांसह ती या स्पर्धेतील तिसरी सर्वात यशस्वी फलंदाज ठरली. तिने गोलंदाजीतही हात आजमावला, तिने सात सामन्यांत चार विकेट घेतल्या आणि केवळ 5.04 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.


दुसरी स्टार प्लेअर म्हणजे सलामीवीर श्वेता. तिने शेफाली आणि ऋचा घोष या स्टार खेळाडूंपेक्षा चमकदार कामगिरी केली. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या तिनेच केली. तिने 139.43 च्या स्ट्राइक रेटने आणि 99 च्या सरासरीने धावा केल्या. तसंच पार्श्वीने भारताच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये केवळ दोन विकेट्स घेतल्या परंतु शेवटच्या टप्प्यात तिने शानदार गोलंदाजी केली आणि सहा सामन्यांमध्ये 11 बळी घेऊन ती स्पर्धेतील दुसरी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. या लेगस्पिनरने संघाच्या शेवटच्या सुपर सिक्स सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पाच धावांत चार बळी घेतले होते. उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 20 धावांत तीन आणि त्यानंतर अंतिम सामन्यात 13 धावांत दोन बळी तिने घेतले.


या खेळाडूंचाही समावेश


या संघात इतर संघाचा विचार करता संघाचे नेतृत्व इंग्लंडच्या ग्रेस स्क्रिव्हन्सकडे सोपवण्यात आले आहे, तर तिच्या आणखी दोन सहकारी हॅना बेकर आणि एली अँडरसन यांना या संघात स्थान मिळाले आहे. न्यूझीलंडची जॉर्जिया प्लिमर, श्रीलंकेची देवमी विहागा, बांगलादेशची शोर्ना अख्तर, दक्षिण आफ्रिकेची कराबो मॅसिओ, ऑस्ट्रेलियाची मॅगी क्लार्क आणि पाकिस्तानची अनुशा नासिर यांचाही या संघात समावेश आहे.






हे देखील वाचा-