ICC Women's Ranking: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर आयसीसीनं मंगळवारी महिला फलंदाजांची क्रमावरीका जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं . आयसीसी क्रमवारीत 25 व्या क्रमांकावर असलेल्या हरमनप्रीत कौरनं 13 व्या स्थानी झेप घेतली आहे. तर, सलामीवीर शेफाली वर्मा (Shefali Varma) तीन स्थानांची झेप घेऊन 33 व्या क्रमांकावर पोहचली आहे. तसेच श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टूनं (Chamari Athapaththu) टॉप 10 मध्ये एन्ट्री केली आहे. आयसीसी क्रमवारीत सध्या ती आठव्या स्थानावर आहे. 


श्रीलंका दौऱ्यावर भारतानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 असा विजय मिळवला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं 34 धावांनी आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्सनं विजय मिळवला. त्यानंतर अखरेच्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सनं विजय मिळवत श्रीलंकेला क्लीन स्पीप दिला. या मालिकेत हरमनप्रीत कौरनं 119 धावा करत तीन विकेट्स घेतल्या. ज्यामुळं आयसीसी क्रमवारीत तिला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं. या क्रमवारीत यास्तिका भाटिया 45 तर, पूजा वस्त्राकर 53 व्या स्थानी पोहचली आहे. 


भारतीय पुरूष संघाचा दबदबा
भारतीय पुरूष संघ सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या, कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय क्रिकेट संघ हा एकमेव संघ आहे, जो तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप 3 मध्ये स्थान आहे. एकेकाळी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर होता. परंतु, मध्यंतरीच्या काळात भारतानं फार कमी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामुळं भारताची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली होती. मात्र, भारतीय पुरूष संघाला आगामी काळात अनेक एकदिवसीय क्रिकेट सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत भारताला पहिलं स्थान गाठण्याची संधी आहे. महत्वाचं म्हणजे, आससीसी क्रमवारीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानांमध्ये खूप अंतर असल्यानं भारताला एक- दोन सामने जिंकून चालणार नाही. 


हे देखील वाचा-