मुंबई : दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू झाला. हेलिकॉप्टर अपघातात रविवारी त्याने प्राण गमावले. कॅलिफॉर्नियाच्या कॅलाबॅससमध्ये हा अपघात झाला, ज्यात कोबी ब्रायंटसह नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कोबी ब्रायंटच्या मुलीचाही समावेश आहे. कोबी ब्रायंट हे बास्केटबॉल जगतातील मोठं नावं होतं. त्याच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.


41 वर्षीय कोबी ब्रायंट हा महान बास्केटबॉलपटू होता. प्रतिष्ठित नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनशी तो 20 वर्ष संलग्न होता. यादरम्यान त्याने पाच चॅम्पियनशिप आपल्या नावावर केल्या. त्याला 18 वेळा ऑल स्टारने गौरवण्यात आलं होतं. 2016 मध्ये एनबीएचा तिसरा सर्वात मोठा ऑल टाईम स्कोअरर म्हणून तो निवृत्त झालं. कोबी ब्रायंटने 2008 आणि 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या संघासाठी दोन सुवर्ण पदकांचीही कमाई केली होती.


कसा झाला अपघात?
कोबी ब्रायंट प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर लॉस एन्जिलिसपासून सुमारे 65 किमी अंतरावर अचानक कोसळलं. हवेत असतानाच हेलिकॉप्टरमध्ये अचानक आग लागली, त्यानंतर ते खाली कोसळलं, ज्यात सर्व जणांचा मृत्यू झाला. ज्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला ते कोबीचं खासगी हेलिकॉप्टर होतं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, सध्या याचा तपास सुरु आहे.


ट्रम्प आणि ओबामा यांच्याकडून शोक
कोबी ब्रायंट यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही शोक व्यक्त केला आहे. "जगातील महान बास्केटबॉलपटू असून त्यांनी नुकतीच आपल्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांचं आपल्या कुटुंबावर अतिशय प्रेम होतं. तो भविष्याबाबत आशावाद असते. त्यांची मुलगी गियानाचा मृत्यू या घटनेची तीव्रता आणखीच वाढवते," असं ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिलं आहे.





तर दुसरीकडे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही कोबी ब्रायंटच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "कोबी ब्रायंट महान होते. ते आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करत होते. पालक म्हणून गियानाचा मृत्यू आमच्यासाठी दु:खद घटना आहे. मिशेल आणि मी वेनेसा तसंच संपूर्ण ब्रायंट कुटुंबाचं सांत्वन करतो."