नवी दिल्ली : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात (IPL) 2020 ही स्पर्धा 29 मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेची फायनल 24 मे रोजी मुंबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच यंदाच्या हंगामातील सर्व सामने दरवर्षीप्रमाणे रात्री आठ वाजता सुरू केले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावेळी बोलताना हे स्पष्ट केलं की, आयपीएलच्या 13व्या हंगामाचा अंतिम सामना हा अहमदाबाद येथे न होता मुंबईमध्ये होणार आहे. या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह आणि सचिव जय शाह हे उपस्थित होते.


बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'आयपीएलच्या रात्रीच्या सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व सामने रात्री ८ वाजता खेळवण्यात येतील. हे सामने 7.30 वाजता व्हावेत, अशी चर्चा झाली. मात्र, बैठकीत तसा कोणताच निर्णय झालेला नाही. यावर्षी केवळ पाच सामनेच 4 आणि 8 वाजल्यापासून खेळवण्यात येणार आहेत. तसेच, पहिल्यांदाच नोबॉलसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात येणार आहे.'


गांगुली यांनी पुढे बोलताना सांगितले की, ' आयपीएल सुरू होण्यापूर्वी तीन दिवस आधी आयपीएल ऑलस्टार सामना खेळवण्यात येणार आहे. परंतु, हा सामना अहमदाबाद येथे होणार नाही. कारण तेथे स्टेडियमचे काम अजूनही सुरू आहे. या सामन्यातून उभा राहणारा आर्थिक निधी कुणाला द्यायचा? याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.'





आयपीएल लिलावात पॅट कमिन्स सर्वात महागडा


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा आगामी आयपीएलसाठी झालेल्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं कमिन्सवर तब्बल साडेपंधरा कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. आयपीएलच्या या लिलावात ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेलला 10 कोटी 75 लाख रुपयांची बोली लागली. किंग्स इलेव्हन पंजाबनं मॅक्सवेलवर पावणेअकरा कोटींची बोली लावली. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसवर बंगलोरनं दहा कोटी रुपयांची बोली लावली. वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉटरेल आणि शिमरॉन हेटमायरला अनुक्रमे साडेआठ कोटी आणि पावणेआठ कोटी रुपयांची बोली लागली. कॉटरेलला पंजाबनं, तर हेटमायरला दिल्लीनं विकत घेतलं. लेग स्पिनर पियुष चावला हा भारताचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पियुष चावलाला चेन्नई सुपर किंग्सनं सहा कोटी 75 लाखांची बोली लावली.


संबंधित बातम्या :


IPL 2020 | 'या' तारखेला आयपीएलच्या 13 व्या सीझनचा वाजणार बिगुल


IPL auction : आयपीएल लिलावात पॅट कमिन्स सर्वात महागडा खेळाडू तर मुंबईचा यशस्वी जैस्वाल करोडपती