ICC Abolish Soft Signal: क्रिकेटमध्ये सॉफ्ट सिग्नलचा नियम अखेर संपणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, हा नियम 7 जूनपासून होणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship: WTC) पासून हद्दपार होणार आहे. दरम्यान, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमध्ये WTC फायनल होणार आहे.
'क्रिकबझ'च्या हवाल्यानं ही बातमी समोर आली आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष असताना या निर्णयाला सौरव गांगुली यांनी मान्यता दिल्याचं बोललं जात आहे. तसेच, सॉफ्ट सिग्नल समाप्त करण्याच्या निर्णयाची माहिती डब्ल्यूटीसी (WTC) फायनल खेळणाऱ्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना देण्यात आली आहे.
जर खराब लाईट असेल तर ऑन होणार फ्लड लाईट्स
तसेच, क्रिकबझनं असंही म्हटलं आहे की, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जर मैदानातील नैसर्गिक प्रकाशाची स्थिती खराब असेल, तर फ्लडलाईट्स चालू करता आले असते. दरम्यान, या सामन्यांसाठी एक रिजर्व दिवस (सहावा दिवस) असेल.
सॉफ्ट सिग्नल नियमावरून अनेकदा झालेत वाद
क्रिकेटच्या इतिहासात सॉफ्ट सिग्नल रूल (soft signal rule) नेहमीच वादाच्या गराड्यात राहिला आहे. अनेक दिग्गजांनी सॉफ्ट सिग्नल नियमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, अनेक माजी आणि सध्याच्या खेळाडूंनी हा नियम रद्द करण्याबाबत भाष्य केलं होतं. बर्याच तज्ञांनी सांगितलं की, सॉफ्ट सिग्नल नियम काढून टाकला पाहिजे आणि मैदानात उपस्थित असलेल्या थर्ड अंपायरनं त्याबद्दल निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण ते आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज आहेत. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सनंही या वर्षाच्या सुरुवातीला या वादग्रस्त नियमावर प्रश्न उपस्थित केले होते.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान, कांगारू संघाचा फलंदाज मार्नस लॅबुशेनला सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट करण्यात आलं होतं. पण, स्लिपमध्ये पकडलेला कॅच संशयास्पद वाटत होता. यानंतर असा युक्तिवाद होऊ लागला की, जेव्हा अंपायरला एखादा आऊट विवादित आढळतो, तेव्हा तो थर्ड अंपायरकडे का पाठवला जात नाही?
दरम्यान, या नियमामुळे स्टोक्सच्या संघाला गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात फायदा झाला होता. पाकिस्तानचा फलंदाज सौद शकीलला पंचांनी सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट दिले होते.
सॉफ्ट सिग्नल रुल नेमका आहे तरी काय?
सॉफ्ट सिग्नल रुलचा वापर थर्ड अंपायर (टीवी अंपायर) तेव्हा करतात, जेव्हा ते कोणत्याही निर्णयावर पोहोचू शकत नाहीत. एखादा कॅच किंवा कोणताही कठिण निर्णय देण्यासाठी फिल्ड अंपायर तो थर्ड अंपायरकडे पाठवतो. टीव्ही अंपायर निर्णय देण्यासाठी उपलब्ध सर्व तंत्रज्ञानाचा वापर करतात. यानंतरही जर टीव्ही अंपायर निर्णय घेऊ शकत नसेल, तर तो मैदानात उपस्थित असलेल्या अंपायरकडून मत घेतो आणि त्याच्या निर्णयावर कायम राहतो.
फिल्ड अंपायर कॅच किंवा अन्य निर्णयासाठी थर्ड अंपायरकडे वळतात. सर्व व्हिडीओ आणि कॅमेरा अँगल बघूनही थर्ड अंपायरचं समाधान होत नाही, मग तो फील्ड अंपायरचंच मत घेतो. जर फील्ड अंपायरने आधीच्या निर्णयात फलंदाजाला बाद घोषित केलं असेल किंवा त्याच्या म्हणण्यानुसार तो बाद झाला असेल, तर थर्ड अंपायर फिल्ड अंपायरसोबत 'सॉफ्ट सिग्नल' देतो. या नियमात फील्ड अंपायरनं परिस्थिती अधिक जवळून पाहिली असल्याचं मानलं जातं.