CSK vs KKR, IPL 2023 : कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्याने चेन्नईचा पराभव केलाय. चेन्नईने दिलेले १४५ धावांचे आव्हान कोलकात्याने सहा विकेट आणि नऊ चेंडू राखून सहज पार केले. चेन्नईकडून दीपक चाहर याने तीन विकेट घेतल्या.  या विजयासह कोलकात्याचे प्लेऑफमधील आव्हान जिवंत राहिलेय. तर चेन्नईचे आव्हान अधीक खडतर झालेय. चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरचा सामना जिंकणे अनिवार्य झालेय.. चेन्नईचा अखेरचा सामना दिल्लीसोबत आहे.


१४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. दीपक चहरने कोलकात्याला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. कोलकात्याला सुरुवात अतिशय खराब मिळाली. रहमनुल्लाह गुरबाज एक धाव काढून बद झाला. गुरबाजनंतर वेंकटेश अय्यरही लगेच तंबूत परतला. वेंकटेश अय्यर याने दोन चौकारासह नऊ धावांची खेळी केली. वेंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर जेसन रॉयही लगेच तंबूत परतला. पावरप्लेमध्ये कोलकात्याचे प्रमुख तीन फलंदाज बाद झाले होते. दीपक चहर याने भेदक मारा करत कोलकात्याची आघाडीची फळी तंबूत धाडली. चेन्नईचा संघ येथून सामन्यात बाजी मारणार असे वाटले पण रिंकू सिंह आणि नीतीश राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला. 


आघाडीची फळी ढासळल्यानंतर पुन्हा एकदा रिंकू आणि राणा कोलकात्याच्या मदतीसाठी धावून आले. दोघांनी डाव सावरला.. सुरुवातीला संयमी फलंदाजी करत खेळपट्टीचा अंदाज घेतला. रिंकू सिंह आणि कर्णधार नीतीश राणा यांनी अर्धशतकी भागिदारी करत चेन्नईच्या हातातून विजय हिसकावून आणला.  चौथ्या विकेटसाठी रिंकू आणि राणा यांनी ७६ चेंडूत ९९ धावांची भागिदारी केली. रिंकू सिंह याने ४३ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. या खेळीत रिंकू सिंह याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. कर्णधार नीतीश राणा याने नाबाद ५७ धावांची खेळी केली. या खेळीत राणाने एक षटकार आणि सह चौकार लगावले. आंद्रे रसेल याने नाबाद दोन धावांची खेळी केली. 


दरम्यान, चेन्नईकडून दीपक चहर याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. दीपक चहर याने तीन विकेट घेतल्या. त्याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. रविंद्र जाडेजा, तुषार देशपांडे, मोईन अळी, महिश तिक्ष्णा, पथिराणा यांना विकेट घेण्यात अपयश आले.