ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेनंतर फलंदाज आणि गोलंदजांची क्रमवारी जारी केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं नुकसान झालं आहे. कसोटी क्रमवारीत विराट कोहली मागील पाच वर्षांत पहिल्यांदाच टॉप 3 मधून बाहेर गेला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अव्वल स्थानी कायम आहे.


न्यूझीलंडचा केन विल्यमसन 919 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. तर स्टीव स्मिथच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. स्मिथकडे 891 अंक असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. भारताविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत शतक करणाऱ्या मार्नस लाबुशेनच्या अंकांमध्ये सुधारणा झाली आहे. विराट कोहलीला मागे टाकून लाबुशेनने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लाबुशेनचे 878 अंक असून विराट कोहलीचे 862 अंक आहेत. परिणामी विराट चौथ्या स्थानावर घसरला आहे.


ICC टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया अव्वल; इंग्लंड कसोटीनंतर अंतिम सामन्याबाबत निर्णय


श्रीलंकेविरुद्ध दुहेरी शतक करणारा जो रुट आता पाचव्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा बाबर आझम सहाव्या स्थानावर आहे. याशिवाय ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियासमोर भिंत बनून उभा राहिलेला चेतेश्वर पुजारा सातव्या क्रमांकावर आहे. याशिवाय बेन स्टोक्स आठव्या स्थानी आहे. विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्त्व करणारा अजिंक्य राहणे नवव्या क्रमांकावर असून हेन्री निकोलस दहाव्या स्थानी आहे.





— ICC (@ICC) January 20, 2021


अश्विन-बुमराला फायदा
बॉर्डर-गावस्कर चषकात मालिकावीर ठरलेला पॅट कमिन्स गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. कमिन्सचे 908 अंक आहेत. तर स्टुअर्ट ब्रॉड 847 अंकांसह दुसऱ्या स्थानी आहे. नील वॅगनर तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा आर अश्विन आणि जसप्रीत बुमराने टॉप 10 गोलंदाजांमध्ये जागा मिळवली आहे. अश्विन आठव्या तर जसप्रीस नवव्या स्थानावर पोहोचले आहेत.


Ind vs Aus | भारतीयांना कमी लेखण्याची चूक कधीही करु नका, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचं सूचक वक्तव्य 


याशिवाय कसोटी मालिकेतील विजयाचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. ऑस्ट्रेलिया मागे टाकत भारताने कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थान मिळवलं आहे. तर न्यूझीलंडचा संघ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. म्हणजेच कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचाच दबदबा कायम आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.